IND vs PAK (Photo Credit - Twitter)

एकदिवसीय विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) भारतात खेळवला जाणार आहे. त्यासाठीची तयारी सुरू झाली असून ती आता जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, चाहते त्याच्या शेड्यूलची वाट पाहत आहेत आणि बहुतेक सर्वजण भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील मोठा सामना कधी खेळला जाईल याची प्रतीक्षा करत आहेत. आयसीसीने अद्याप पूर्ण वेळापत्रक जाहीर केले नसले तरी त्याचे संभाव्य वेळापत्रक समोर आले आहे. तसेच पाकिस्तानी संघ आपले सामने खेळण्यासाठी भारतात येणार हे जवळपास निश्चित दिसत आहे. आयसीसी विश्वचषक 2023 चा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी खेळवला जाऊ शकतो. या दिवशी इंग्लंड आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने येऊ शकतात.

भारत - पाकिस्तान या दिवशी होणार सामना

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार असून हा सामना चेन्नईत खेळवला जाण्याची शक्यता आहे. मोठी बातमी म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर सामना 15 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना रविवारी होणार आहे. असे सांगण्यात येत आहे की आयसीसीने संपूर्ण वेळापत्रक तयार केले आहे आणि आयपीएल 2023 संपल्यानंतर कोणत्याही दिवशी त्याची घोषणा केली जाऊ शकते. (हे देखील वाचा: Virat Kohli Fun Video: मुंबई विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीच्या 'या' कृतीने जिंकले प्रेक्षकांचे मन)

'या' दिवशी खेळवली जावू शकते फायनल

वर्ष 2019 मध्ये जेव्हा एकदिवसीय विश्वचषक झाला तेव्हा या दोन संघांमध्ये अंतिम फेरीत विजेतेपदाची लढत झाली आणि इंग्लंडने घरच्या मैदानावर खेळताना प्रथमच 50 षटकांचा विश्वचषक जिंकला. म्हणजेच आधीचा विश्वचषक जिथे संपला, तिथून नवा सुरू होईल. ही फायनल 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाऊ शकते, अशी बातमी आहे. म्हणजेच या दिवशी आपल्याला एकदिवसीय विश्वचषकाचा नवा चॅम्पियन मिळेल.