Team India: ‘या’ समानतेने संपुष्टात आली एमएस धोनी आणि Mithali Raj ची कारकीर्द, जाणून व्हाल थक्क
एमएस धोनी, मिताली राज (Photo Credit: PTI, Instagram)

Cricketer Mithali Raj Retires: भारतीय कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) 23 वर्षांच्या दीर्घ आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर बुधवारी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. मिताली राजला महिला क्रिकेटचा सचिन तेंडुलकर म्हटले जाते कारण या दोन्ही खेळाडूंनी लहान वयात पदार्पण केले आणि भारतीय क्रिकेटची (Indian Cricket) दीर्घकाळ सेवा केली. 26 जून 1999 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मिताली राजने महिला विश्वचषक 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता, ज्यामध्ये टीम इंडियाला (Team India) पराभवाचा सामना करावा लागला होता तसेच टीम लीग स्टेजमधून बाहेर पडली होती. मितालीने दोन दशकांहून अधिक काळ भारतीय महिला क्रिकेटची जगभरात ओळख निर्माण करून दिली आहे. तसेच या दिग्गज खेळाडूने फलंदाज आणि कर्णधार म्हणून अनेक विक्रमही नोंदवले आहेत. (Mithali Raj Retires: ग्रेट कॅप्टन! मिताली राजचे हे रेकॉर्ड मोडणं अशक्यच आहे, दोन दशकाहून अधिक गाजवलंय मैदान)

दरम्यान मिताली राजच्या निवृत्तीनंतर तिची भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीशी (Mahedra Singh Dhoni) तुलना होऊ लागली आहे. मिताली राजचे निवृत्तीचे विधान ऑनलाइन समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी भारतातील महिला क्रिकेटमधील तिच्या योगदानाबद्दल तिचे आभार मानले. तथापि, एका चाहत्याने धोनी आणि मिताली राज यांच्या निवृत्तीच्या घोषणेमधील समानता समोर मांडली. निवृत्ती घेतल्यानंतर या दोन्ही खेळाडूंमध्ये एक नाही तर पाच साम्य आढळून आले, जे पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

- दोघांनी भारतासाठी सर्वाधिक सामने खेळले. मिताली राजने 199 सामन्यांमध्ये भारतीय महिला संघाचे नेतृत्व केले (155 एकदिवसीय सामने, 32 टी-20, 12 कसोटी), महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जास्त. दुसरीकडे, धोनीने एकूण 331 सामन्यांमध्ये (60 कसोटी, 199 एकदिवसीय आणि 72 टी-20) भारताचे नेतृत्व केले जे कोणत्याही कर्णधाराने खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिक आहे.

- एकदिवसीय विश्वचषकात धोनी आणि मिताली राज यांनी भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. धोनीने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 9 जुलै 2019 रोजी न्यूझीलंड विरुद्ध 2019 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळला. दुसरीकडे, मिताली राजने 27 मार्च 2022 रोजी एकदिवसीय विश्वचषकादरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिचा अंतिम सामना खेळला.

- दोघांमधील आणखी एक उल्लेखनीय साम्य म्हणजे त्यांनी त्यांच्या अंतिम सामन्यात अर्धशतके झळकावली. एमएस धोनीने न्यूझीलंडविरुद्ध ५० धावा केल्या होत्या, तर मिताली राजने तिच्या अंतिम सामन्यात ६८ धावा केल्या होत्या. तथापि, दोन्ही फलंदाजांनी केलेले प्रयत्न पुरेसे ठरले नाहीत आणि भारताने तो सामना गमावला आणि विश्वचषकातून बाहेर पडला. एवढी गौरवशाली कारकीर्द असूनही दोन्ही क्रिकेटपटूंनी एकही फेअरवेल मॅच खेळली नाही.

महेंद्र सिंह धोनीने इंग्लंडमध्ये आयोजित 2019 वर्ल्ड कप स्पर्धेत शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. धोनीने त्यानंतर पुढील वर्षी म्हणजे 2020 मध्ये 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.