
IND vs UAE: आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात इतिहास रचला आहे. १० सप्टेंबर रोजी दुबईमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने यूएईचा ९ विकेट्सने दारुण पराभव केला. याच विजयासह, भारताने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठा विजय (चेंडू बाकी असताना) नोंदवला आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यूएईचा संपूर्ण संघ अवघ्या ५७ धावांवर बाद झाला. टीम इंडियाकडून शिवम दुबे आणि कुलदीप यादव यांनी भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. दुबेने ३ आणि कुलदीपने ४ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने हे लक्ष्य अवघ्या ४.३ षटकांत (२७ चेंडू) सहज गाठले. भारताने ९३ चेंडू बाकी असताना हा विजय मिळवला आणि एक नवा इतिहास रचला.
T20I मध्ये भारताचा सर्वात मोठा विजय
चेंडू शिल्लक राहण्याच्या आधारावर, भारताने नोंदवलेले हे आतापर्यंतचे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठे विजय आहेत:
- ९३ चेंडू – भारत विरुद्ध यूएई, दुबई २०२५ (नवीन विक्रम)
- ८१ चेंडू – भारत विरुद्ध स्कॉटलंड, दुबई २०२१
- ६४ चेंडू – भारत विरुद्ध बांगलादेश, हांगझोऊ २०२३
- ५९ चेंडू – भारत विरुद्ध यूएई, मीरपुर २०१६
सामन्याचा थरार असा होता
आशिया कप २०२५ मधील भारत विरुद्ध यूएई (Ind vs Uae Asia Cup 2025) सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यूएईच्या डावाची सुरुवात सलामीवीर अलीशान शराफू (१७ चेंडूत २२ धावा) आणि वसीम मुहम्मद (२२ चेंडूत १९ धावा) यांनी काही चौकार मारून केली, मात्र भारतीय फिरकीपटू समोर त्यांची मधली फळी पूर्णपणे कोलमडली.
कुलदीप यादवने २.१ षटकात केवळ ७ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याला शिवम दुबेची उत्तम साथ मिळाली, ज्याने ४ धावा देत ३ विकेट्स घेतल्या आणि यूएईचा संपूर्ण संघ १३.१ षटकात केवळ ५७ धावांवर सर्वबाद झाला.
प्रत्युत्तरात, ५८ धावांचे सोपे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने अत्यंत वेगाने विजय मिळवला. सलामीवीर अभिषेक शर्माने १६ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३० धावांची शानदार खेळी केली. उपकर्णधार शुभमन गिलने देखील ९ चेंडूत नाबाद २० धावा केल्या. कर्णधार सूर्याने २ चेंडूत ७ धावांची नाबाद खेळी केली आणि भारताने ४.३ षटकांत ६०/१ धावा करून सामना जिंकला.