
Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Indian Premier League 2025: इंडियन प्रीमियर लीग 2025 (Indian Premier League 2025) मध्ये सलग तीन पराभव स्वीकारणारे सनरायझर्स हैदराबाद (SRH) आता त्यांच्या पुढील सामन्यात गुजरात टायटन्स (GT) चे यजमानपद भूषवेल. हा सामना स्पर्धेतील 19 वा आणि एसआरएचचा या हंगामातील पाचवा आणि जीटीचा चौथा सामना असेल. एसआरएच पॉइंट टेबलमध्ये तळाशी असताना, जीटी सलग दोन विजयांसह उत्तम फॉर्ममध्ये आहे. गेल्या हंगामात उपविजेते राहिलेल्या सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2025 ची सुरुवात दमदार पद्धतीने केली. त्यांनी राजस्थान रॉयल्सचा 44 धावांनी पराभव करून हंगामाची सुरुवात केली. पण यानंतर संघाची कामगिरी पूर्णपणे ढासळली. संघाने सलग तीन सामने गमावले आहेत आणि तेही मोठ्या फरकाने. विशेषतः शेवटच्या सामन्यात, हैदराबादला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 80 धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला.
दुसरीकडे, गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जविरुद्धचा पहिला सामना 11 धावांनी गमावला. परंतु त्यानंतर त्यांनी जोरदार पुनरागमन केले आणि मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सारख्या बलाढ्य संघांना पराभूत केले. या सामन्यात, सर्वांचे लक्ष SRH च्या पुनरागमनावर असेल, तर GT त्यांचा विजयी सिलसिला सुरू ठेवण्याचा प्रयत्न करेल.
हैदराबाद हवामान अपडेट
एसआरएच विरुद्ध जीटी हा सामना 6 एप्रिल (रविवार) रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, सामन्यादरम्यान हैदराबादमधील हवामान स्वच्छ आणि थंड राहण्याची अपेक्षा आहे. पावसाची शक्यता नाही, त्यामुळे एका उत्तम क्रिकेट सामन्याची आशा आहे. संध्याकाळी तापमान सुमारे 28 अंश सेल्सिअस राहील. जे रात्री 11 वाजेपर्यंत 26 अंशांपर्यंत घसरेल.
राजीव गांधी स्टेडियमचा खेळपट्टी अहवाल
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते. येथे गोलंदाजांना फारशी मदत नाही. त्यामुळे एसआरएच विरुद्ध जीटी सामना हा उच्च-स्कोअरिंग सामना असू शकतो. सहसा इथे दुसऱ्या डावात दवाचा प्रभाव असतो, ज्यामुळे चेंडू फलंदाजांना सोपा होतो. म्हणूनच येथे नाणेफेक जिंकल्यानंतर संघ प्रथम गोलंदाजी करायला पसंत करतात.