Sunil Joshi. (Photo Credits: Getty Images)

भारतीय क्रिकेट संघाला दोन नवीन निवडकर्ते मिळाले असून, ते दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी 2 नवीन निवडकर्त्यांची घोषणा केली. बीसीसीआयने ज्येष्ठ निवड समितीसाठी सुनील जोशी (Sunil Joshi) आणि हरविंदरसिंह (Harvinder Singh) यांची नावे निश्चित केली आहेत. माजी डावखुरे फिरकीपटू सुनील जोशी यांना भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य निवडकर्ता म्हणून निवडण्यात आले आहे, तर हरविंदरसिंह निवड समितीच्या-सदस्यीय समितीच्या टीममध्ये असतील.

मुंबईमध्ये क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्यांनी, निवड समितीच्या पदाच्या  मुलाखतीसाठी 5 सदस्यांना बोलावले होते. यामध्ये व्यंकटेश प्रसाद, लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि राजेश चौहान अपयशी ठरले, तर सुनील जोशी आणि हरविंदरसिंह यांची निवड करण्यात आली. याबाबत माजी भारतीय क्रिकेटपटू मदन लाल, आरपी सिंग आणि महिला खेळाडू सुलक्षणा नाईक यांच्यासह, क्रिकेट सल्लागार समितीची (CAC) बुधवारी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात बैठक पार पडली. (हेही वाचा: हार्दिक पांड्याची डीवाय पाटील टी 20 स्पर्धेत वादळी खेळी: 37 चेंडूत झळकावले शतक; पहा व्हिडिओ)

क्रिकेट सल्लागार समितीने सुनील जोशी यांची निवड समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली होती. सीएसी या उमेदवारांच्या कामाचा एक वर्षासाठी आढावा घेईल आणि त्यानंतर बीसीसीआयकडे अहवाल सादर करेल. दरम्यान, सुनील जोशी यांनी 1996 ते 2020 या कालावधीत भारतीय संघासाठी एकूण 15 कसोटी सामने खेळले आहेत. 1991 ते 2001या काळात त्यांनी संघासाठी 69 वन डे सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. सुनील जोशी यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 41आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 69 विकेट्स घेतल्या आहेत. सुनील जोशी 2008 आणि 2009 मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळले होते.