SRH vs RCB IPL 2021 Match 7: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) विरोधात चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) फिरकीपटू शाहबाझ अहमदच्या (Shahbaz Ahmed) फिरकीच्या जोरावर 6 धावांनीं रोमहर्षक विजय मिळवला. निर्णायक क्षणी शाहबाज अहमदने सर्वाधिक 3 विकेट घेत संघाला सामन्यात पुनरागमन करून दिलं. आरसीबीच्या (RCB) आजच्या सामन्यातील विजयामुळे हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरचे (David Warner) झुंजार अर्धशतक व्यर्थ गेले. कर्णधार वॉर्नरने पुढाकार घेत संघाचे नेतृत्व करत 54 धावा केल्या. वॉर्नर आणि मनीष पांडेने 83 धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ नेले होते मात्र मधल्या फळीतील अपयशामुळे संघाच्या हातून सामना निसटला. वॉर्नर वगळता पांडेने 38 तर जॉनी बेयरस्टोने 12 धावा केल्या. अन्य फलंदाज एकेरी धावसंख्याच करू शकले. विशेष म्हणजे हैदराबादचा चेपॉक स्टेडियमवरील हा सलग पाचवा पराभव ठरला. शाहबाज अहमदने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या मोहम्मद सिराजला 2 तर काईल जेमीसन आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी 1 विकेट मिळली. (SRH vs RCB IPL 2021 : Glenn Maxwell ची अर्धशतकी झुंज, रॉयल चॅलेंजर्स फलंदाजांची घसरगुंडी; हैदराबादपुढे 150 धावांचे लक्ष्य)
दीडशे धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादकडून कर्णधार वॉर्नरसह रिद्धिमान साहाची जोडी मैदानात उतरली. मात्र, संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि तिसऱ्या ओव्हरमधेच साहा सिराजच्या चेंडूवर 1 धाव करून ग्लेन मॅक्सवेलकडे झेलबाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला. विशेष म्हणजे सिराजने पहिली ओव्हर निर्धाव टाकली होती. त्यानंतर मनीष पांडे आणि वॉर्नरने डाव सांभाळला. या दोघांनी पॉवरप्लेमध्ये 1 बाद 50 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर पांडे आणि वॉर्नरने आपली अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. त्यांनतर मागिलस सामन्यात स्वस्तात बाद झालेल्या वॉर्नरने 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतकी खेळीनंतर जेमीसनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात वॉर्नर बाद होऊन तंबूत परतला. वॉर्नरने 7 चौकार आणि एका षटकारासह 54 धावांची निर्णायक खेळी केली. त्यानंतर, निर्णायक क्षणी शाहबाद अहमदने हैदराबादला सलग दोन झटके तर ओव्हरमध्ये तीन झटके दिले. अहमदने बेयरस्टो आणि पांडेला माघारी धाडलं त्यानंतर ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर अब्दुल समदला तंबूचा मार्ग दाखवला.
यापूर्वी, टॉस जिंकून गोलंदाजी करत हैदराबादने बॉलर्स आणि क्षेत्ररक्षकांच्या दमदार कामगिरीमुळे बेंगलोरला 20 ओव्हरमध्ये 8 बाद 149 धावांवर रोखलं. जेसन होल्डरला 3 विकेट मिळाल्या तर राशिद खानने 2 गडी बाद केले.