Sourav Ganguly (Photo Credit - Twitter)

Sourav Ganguly Re-elected as Bengal Cricket President:  भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांची पुन्हा एकदा बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB) चे नवे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. त्यांनी रविवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि थेट अध्यक्षपदी त्यांची निवड निश्चित झाली. या पदावर गांगुलीने त्याचे मोठे भाऊ स्नेहाशिष गांगुली यांची जागा घेतली आहे. गांगुलीची या पदावर नियुक्ती होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ते २०१५ ते २०१९ पर्यंत सीएबीचे अध्यक्ष होते, त्यानंतर त्यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. आता गांगुली २८ सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (एजीएम) सीएबीचे प्रतिनिधित्व करतील. सीएबी एपेक्स कौन्सिलने त्यांना एकमताने एजीएमसाठी प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले आहे.

'कॅब'मध्ये मोठे बदल अपेक्षित

रेव्हस्पोर्ट्झच्या वृत्तानुसार, सीएबीच्या सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. यात उपाध्यक्ष अमलेंदू बिस्वास, सचिव नरेश ओझा, कोषाध्यक्ष प्रबीर चक्रवर्ती आणि संयुक्त सचिव देबब्रत दास यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, देबब्रत दास यांच्यावर आर्थिक अनियमिततेचा आरोप होता आणि त्यांना एपेक्स कौन्सिलने आधीच निलंबित केले होते. आता उर्वरित पदांसाठी लवकरच निवडणुका होतील आणि त्यानंतर नव्या अधिकाऱ्यांची निवड केली जाईल.

CAB सोबतच SA20 मध्येही नवी भूमिका

अलीकडेच, सौरव गांगुलीने दक्षिण आफ्रिकेच्या SA20 लीगमध्ये प्रीटोरिया कॅपिटल्स या फ्रँचायझीच्या मुख्य प्रशिक्षकाची नवी भूमिका स्वीकारली आहे. त्यांनी यापूर्वी या संघाचे प्रशिक्षक असलेले जोनाथन ट्रॉट यांची जागा घेतली. प्रिटोरिया कॅपिटल्सने SA20 लीगमध्ये संमिश्र कामगिरी केली आहे. पहिल्या हंगामात, संघाने गट टप्प्यात अव्वल स्थान मिळवले होते, परंतु अंतिम फेरीत त्यांना सनरायझर्स ईस्टर्न केपकडून पराभव पत्करावा लागला. २०२३-२४ आणि २०२४-२५ च्या हंगामात संघाची कामगिरी साधारण होती आणि दोन्ही वेळा ते पाचव्या स्थानावर राहिले, ज्यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही.

खेळाडूंच्या लिलावादरम्यान केशव महाराज आणि तरुण फलंदाज देवाल्ड ब्रेव्हिस यांना करारबद्ध करून गांगुलीने सर्वांचे लक्ष वेधले. ब्रेव्हिस SA20 च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. गांगुलीच्या या निर्णयांचे कौतुक केले जात आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली प्रिटोरिया कॅपिटल्स चांगली कामगिरी करून ट्रॉफी जिंकेल अशी अपेक्षा आहे.