राजस्थान रॉयल्स (Photo Credit: PTI)

RR vs DC, IPL 2020: राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) टॉस जिंकून आयपीएलच्या (IPL) 23व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) पहिले फलंदाजीसाठी बोलावले. अशा स्थितीत, दिल्लीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 184 धावा केल्या आणि रॉयल्ससमोर विजयासाठी 185 धावांचे लक्ष ठेवले. दिल्लीकडून शिमरॉन हेटमायरने (Shimron Hetmyer) 45 धावा केल्या, मार्कस स्टोइनीस (Marcus Stoinis) 39 आणि कर्णधार श्रेयस अय्यर 29 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, रॉयल्सने गोलंदाजीने दिल्लीवर वर्चस्व कायम ठेवले आणि टीमच्या धावगतीवर वेसण लगावला. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) सर्वाधिक 3, तर कार्तिक त्यागी, राहुल तेवतिया आणि आज यंदा आपला पहिला सामना खेळणाऱ्या अँड्र्यू टाय यांनी प्रत्येकी 1 विकेट मिळाली. आजच्या सामन्यात दिल्लीचे फलंदाज घाईत असलयाचे दिसले. या सामन्यात राजस्थान संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला. (RR vs DC, IPL 2020: शिखर धवन पुन्हा अपयशी, RR विरुद्ध अजिंक्य रहाणेला संधी न दिल्याने संतप्त नेटकऱ्यांनी दिल्ली व्यवस्थापनावर व्यक्त केली नाराजी)

नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजीला आल्यानंतर कॅपिटल्सला दुसर्‍या ओव्हरमध्ये आर्चरने पहिला धक्का दिला आणि शिखर धवनला स्वस्तात 5 धावांवर माघारी धाडले. दुसरा धक्का पृथ्वी शॉच्या रूपात बसला, जो 10 चेंडूत 19 धावा करून आर्चरचा शिकार बनला. त्यानंतर कर्णधार श्रेयस 18 चेंडूत 22 धावा करून रनआऊट झाला. रिषभ पंत देखील घाईत दिसला आणि 5 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर स्टोइनीस देखील 30 चेंडूत 39 धावा करून तेवतियाचा शिकार बनला. दिल्लीने आजच्या सामन्यात नियमित अंतरावर विकेट गमावल्या. हेटमायर देखील मोठा डाव खेळू शकला नाही, अवघ्या पाच धावांनी त्याचे अर्धशतक हुकले आणि 45 धावांवर तो बाद झाला. अक्षर पटेल 8 चेंडूत 17 धावा करून टायचा शिकार ठरला. आठवी विकेट हर्षल पटेलच्या रूपात राजस्थानला मिळाली ज्याने 16 धावा केल्या. दिल्लीकडून कगिसो रबाडा 2 धावांवर नाबाद परतला.

दुसरीकडे, आजच्या सामन्यासाठी राजस्थानने त्यांच्या टीममध्ये दोन बदल केले. अंकित राजपूत आणि टॉम करन यांच्याजागी अँड्र्यू टाय आणि वरुण आरोनला संधी दिली आहे. तर दिल्लीने त्यांच्या टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत.