
RR vs RCB IPL 2025 28th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 28 वा सामना रविवार म्हणजेच 13 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RR vs RCB) यांच्यात जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्स 9 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने बंगळुरुसमोर 174 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बंगळुरुने 17.3 षटकात लक्ष्य गाठले.
यशस्वी जयस्वालने खेळली 75 धावांची शानदार खेळी
प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकांत चार गडी गमावून 173 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सचा घातक सलामीवीर यशस्वी जयस्वालने 75 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, यशस्वी जयस्वालने 47 चेंडूत 10 चौकार आणि दोन षटकार मारले. यशस्वी जयस्वाल व्यतिरिक्त ध्रुव जुरेलने नाबाद 35 धावा केल्या. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, कृणाल पांड्या आणि यश दयाल यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या.
फिलिप सॉल्ट आणि विराट कोहलीची शानदार खेळी
त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 17.3 षटकांत फक्त एक विकेट गमावून लक्ष्य गाठले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून स्फोटक सलामीवीर फिलिप सॉल्टने 65 धावांची शानदार खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान, फिलिप सॉल्टने 33 चेंडूत पाच चौकार आणि सहा षटकार मारले. फिलिप सॉल्ट व्यतिरिक्त, विराट कोहलीने नाबाद 62 धावा केल्या. त्याच वेळी, राजस्थान रॉयल्सकडून कुमार कार्तिकेयने सर्वाधिक एक विकेट घेतली. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही गोलंदाजाला विकेट मिळाली नाही.