
IND vs AFG: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) आतापर्यंत रोमांचक सामने झाले आहेत. या विश्वचषकाच्या साखळी सामन्यांमध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली आहे. आता टीम इंडिया सुपर (Team India) 8 सामन्यांसाठी मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा पहिला सामना अफगाणिस्तान (IND vs AFG) संघाविरुद्ध आहे. हा सामना 20 जून रोजी होणार आहे. ग्रुप स्टेजच्या 4 सामन्यांमध्ये टीम इंडियाने आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेविरुद्ध तीन सामने जिंकले, तर खराब आउटफिल्डमुळे कॅनडाविरुद्धचा सामना रद्द करावा लागला आणि दोन्ही संघांना 1-1 गुणांवर समाधान मानावे लागले. एकूण 7 गुणांसह गुणतक्त्यात अव्वल असलेल्या टीम इंडिया सुपर 8 मध्ये पोहोचली आहे. सुपर 8 मध्ये टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचा आहे.
या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड खूपच खराब
दोन्ही संघांमधील हा सामना केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवला जाईल. या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. या मैदानावर टीम इंडियाने एकही सामना जिंकलेला नाही. टीम इंडियाने या मैदानावर 2010 मध्ये शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. टीम इंडियाने या मैदानावर आतापर्यंत केवळ दोन टी-20 सामने खेळले असून दोन्ही सामन्यांमध्ये टीमचा पराभव झाला आहे. 2010 च्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा या मैदानावर वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता.
हे देखील वाचा: IND vs AFG T20 WC 2024 Super-8: अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंग ठरणार नंबर-1! रोहित आणि विराट यांच्यात वर्चस्वाची लढाई
रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा
बार्बाडोसच्या मैदानावर कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. रोहित शर्माने या मैदानावर दोन सामन्यांत 82 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा एका डावात अवघ्या 5 धावा करून बाद झाला, मात्र दुसऱ्या डावात रोहित शर्माने 79 धावांची नाबाद खेळी केली. या मैदानावर अर्धशतक झळकावणारा रोहित शर्मा हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. याशिवाय रोहित शर्माने या मैदानावर भारतासाठी सर्वाधिक षटकारही ठोकले आहेत. या मैदानावर रोहित शर्माने 6 षटकार मारले होते.