Rohit Sharma (Photo Credit - X)

मुंबई: रोहित शर्मा (Rohit Sharma) हा टीम इंडियाचा (Team India) असा खेळाडू आहे ज्याला पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. मग ते मैदानावर असो वा मैदानाबाहेर. टी-20 विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यानंतर या अनुभवी खेळाडूने आपल्या टी-20 कारकिर्दीला पूर्णविराम दिला. त्यानंतर चाहत्यांची चिंता वाढली, कारण रोहित शर्माला ॲक्शनमध्ये पाहण्यासाठी त्यांना बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. पण आता अपडेट असा आहे की, हिटमॅनला श्रीलंका दौऱ्यातच मैदानात पाहता येणार आहे. 17 जुलै रोजी श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा अपेक्षित होती. मात्र निवड बैठक एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. आता 18 जुलैला ही बैठक होणार असून टीम इंडियाची घोषणा होणार आहे.

रोहित शर्मा वनडे मालिकेसाठी होऊ शकतो उपलब्ध 

क्रिकबझच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा ऑगस्टमध्ये होणाऱ्या भारत-श्रीलंका वनडे मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकतो. नवीन प्रशिक्षक गंभीरने नुकतेच सांगितले होते की, तिन्ही फॉरमॅटसाठी सर्व खेळाडू उपलब्ध असावेत, अशी त्यांची इच्छा आहे, परंतु बैठकीत त्यांनी यावर भर दिला नाही. (हे देखील वाचा: BCCI On Gautam Gambhir: बीसीसीआयने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला दिला मोठा धक्का! एकत्रित 5 मागण्या फेटाळल्या)

कर्णधारपदाचे गूढ उकलणार

रोहित शर्माने श्रीलंका दौऱ्यासाठी ब्रेक घेतल्याच्या बातम्या येत होत्या. पण हिटमॅनचे लक्ष 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर असेल, त्याआधी फारसे एकदिवसीय सामने नाहीत, अशा परिस्थितीत रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी स्वत:ला उपलब्ध करून देऊ शकतो. या मालिकेत रोहित शर्मा आल्यास संघाची कमान त्याच्या हाती येईल आणि कर्णधारपदाचा प्रश्नही सुटणार आहे. टी-20 विश्वचषक 2024 नंतर हिटमॅन अमेरिकेत सुट्टी घालवत आहे. क्रिकबझच्या मते, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर देखील या मालिकेत पुनरागमन करू शकतात.

विराट-बुमराहला मिळू शकते विश्रांती 

रोहितसोबतच विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारख्या स्टार खेळाडूंनाही श्रीलंका दौऱ्यातून विश्रांती देण्याची चर्चा होती. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार बुमराह आणि विराट संघात सामील होण्याची शक्यता नाही. मात्र, हे दोन्ही दिग्गज बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होऊ शकतात. त्याचवेळी 18 जुलै रोजी रोहितच्या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.