मुंबई: श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात अर्धशतके झळकावणारा भारतीय कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत (ICC ODI Ranking) फायदा झाला आहे. रोहितने एका स्थानावर झेप घेतली आहे. टॉप-5 फलंदाजांच्या यादीत तीन भारतीय खेळाडू आहेत. आयसीसी वनडे क्रमवारीत बाबर आझम अव्वल स्थानावर आहे, तर शुभमन गिल दुसऱ्या, रोहित शर्मा तिसऱ्या, विराट कोहली (Virat Kohi) चौथ्या आणि हॅरी टेक्टर पाचव्या स्थानावर आहे. तर गोलंदाजांच्या क्रमवारीत मोहम्मद सिराज पाचव्या स्थानावर आहे. जसप्रीत बुमराह तीन स्थानांच्या नुकसानासह आठव्या स्थानावर पोहोचला आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत केशव महाराज अव्वल स्थानावर आहेत.
टॉप-5 फलंदाजांमध्ये तीन भारतीय खेळाडू
रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात 47 चेंडूत 58 धावांची खेळी केली होती, तर दुसऱ्या वनडे सामन्यात 44 चेंडूत 64 धावा केल्या होत्या. या खेळीमुळे रोहितला एका स्थानाचा फायदा झाला आणि तो चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर गेला. त्याचवेळी विराट कोहली श्रीलंका मालिकेत मोठी खेळी खेळू शकला नाही आणि एका स्थानाच्या घसरणीसह तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या स्थानावर घसरला. एकदिवसीय क्रमवारीत शुभमन गिल दुसऱ्या स्थानावर आहे. (हे देखील वाचा: IND vs SL 3rd ODI: चाहत्यांना धक्का! रोहित शर्मा आणि विराट कोहली आज अखेरच्या वेळी दिसणार निळ्या जर्सीत, जाणून घ्या कारण)
कुलदीप यादवने घेतली लांब उडी
कुलदीप यादवने गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. कुलदीप यादव पाच स्थानांची झेप घेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. टॉप-10 गोलंदाजांच्या यादीत तीन भारतीय गोलंदाज आहेत.