क्रिकेट विश्वचषकनंतर भारतीय क्रिकेट बोर्ड, बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी नव्याने अर्ज मागवले होते. यासाठी हजारो इच्छूकांनी अर्ज केले, ज्यातून माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखालील समितीने सहा नावांची निवड केली होती. या नावांमधून पुन्हा एकदा रवी शास्त्री (Ravi Shastri) यांची भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक (Team India Head Coach) म्हणून निवड करण्यात आली आहे. सध्या रवी शास्त्री हे संघासह वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. कर्णधार विराट कोहली यानेही शास्त्री यांच्याच नावाला पाठींबा दर्शवला होता.
प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्री, ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूड, लालचंद राजपूत, न्यूझीलंडचा माजी प्रशिक्षक माईक हेसन आणि भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि फिल्डिंग कोच रॉबिन सिंह (Robin Singh) अशा सहा नावांचा विचार करण्यात आला होता. 2017 नंतर पुन्हा एकदा शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची कामगिरी चांगलीच उंचावली आहे. रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखालीच भारताने गेल्या वर्षी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा टेस्ट मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. मात्र विश्वचषक 2019 च्या सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर, प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांच्यावर टीकेची झोड उठली होती. (हेही वाचा: टीम इंडियाच्या नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ 2021 वर्ल्ड टी-20 पर्यंतच, वाचा सविस्तर)
आता 2021 पर्यंत रवी शास्त्री हेच भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. दरम्यान रवी शास्त्री 2017 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रुजू झाले. जुलै 2017 पासून भारताने 21 पैकी 13 कसोटी सामने जिंकले आहेत. टी -20 सामन्यात भारताने 36 पैकी 25 सामने जिंकले आहेत. एकदिवसीय सामन्यातही भारतीय संघाने 60 पैकी 43 सामने जिंकून वर्चस्व राखले. शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 70 टक्के आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत, ज्यात दोन आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियामधील ऐतिहासिक कसोटी मालिकेतील विजय यांचा समावेश आहे.