भारताच्या राष्ट्रीय स्तरावरील फर्स्ट क्लास क्रिकेटची सर्वात मोठी टुर्नामेंट रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) यावर्षी न खेळवण्याचा मोठा निर्णय बीसीसीआयने (BCCI) घेतला आहे. 87 वर्षांच्या इतिहासात रणजी ट्रॉफी रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयकडून अंडर 19 साठी विनू मांकड ट्रॉफी (Vinoo Mankad Trophy) अंतर्गत राष्ट्रीय वनडे टुर्नामेंट खेळवण्यात येणार आहे. तर महिलांसाठी 50 ओव्हरची राष्ट्रीय टुर्नामेंट खेळण्यात येणार आहे, असे बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांनी सांगितले. रणजी सामन्यांचे वेळापत्रक शॉर्ट केले तरी कोविड-19 च्या काळात दोन महिन्यांपर्यंत सर्व खेळाडूंना बायोबबल मध्ये ठेवणे हे खूप कठीण आहे.
आम्ही सिनियर महिलांसाठी विजय हजारे ट्रॉफी सह वनडे टुर्नामेंटचं आयोजन करणार आहोत आणि त्यानंतर अंडर 19 खेळाडूंसाठी विनू मंकट ट्रॉफीचे आयोजन करणार आहोत. 2020-21 च्या डॉमेस्टिक सीजनच्या मिळालेल्या फिडबॅकवरुन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शाह यांनी पत्रात लिहिले. ('रणजी ट्रॉफी खेळून घरं चालत नाही!' विदेशी लीग खेळण्याची परवानगी न दिल्याने माजी CSK खेळाडू मनप्रीत गोनी ने BCCI ला फटकारलं)
पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीसाठी बीसीसीआयकडून ग्रुपिंग आणि बायोबबलचे पालन केले जाईल. कोविड-19 संकटामुळे आपला खूप वेळ वाया गेला असून या परिस्थितीमध्ये क्रिकेटचे वेळापत्रक आयोजित करणे खूप कठीण आहे, असे शाह म्हणाले.
रणजी ट्रॉफी रद्द झाल्यामुळे रणजीमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना नुकसान भरपाई देण्यात येईल. देशपातळीवरील खेळाडूंचे आर्थिकदृष्ट्या नुकसान होऊ नये, यासाठी बोर्डाकडून योजना आखली जाईल. यासोबतच सर्व राज्यांनी यशस्वीरीत्या सय्यद मुश्ताक अली टी-20 टुर्नामेंट पार पाडल्यामुळे आभार मानले.
यासोबतच 5 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारताची जोरदार तयारी सुरु आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर सर्व खेळाडूंचा उत्साह आणि आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे.