Prithvi Shaw | (Photo Credits- Twitter @BCCI)

भारताने वेस्टइंडीज संघाचा दुसऱ्या कसोटी सामन्यात १० विकेट्सने धुव्वा उडवून कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवलं. हा मालिका विजय भारताचा घरच्या मैदानावर लागोपाठ दहावा विजय आहे. पहिल्या डावात वेस्टइंडीज संघाच्या ३११ धावांचा सामना करत भारताने ३७६ धावा केल्या. परंतु वेस्टइंडीजचा संघ दुसऱ्या डावात केवळ १२७ धावांवर आटोपला आणि भारताला जिंकण्यासाठी ७२ धावांचं माफक लक्ष्य मिळालं. भारताने ही धावसंख्या एकही विकेट न गमावता गाठली. मालिकेत सर्वात जास्त २७३ धावा करणाऱ्या मुंबईकर पृथ्वी शॉला मालिका विजयाचा पुरस्कार देण्यात आला.

पृथ्वीचे अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर

या मालिकेत पृथ्वी शॉने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने शतक ठोकले. विशेष बाब म्हणजे त्याने रणजी, दुलीप करंडक आणि आंतराष्ट्रीय क्रिकेटच्या पहिल्या सामन्यातच शतक ठोकले आहे. या सोबत त्याने दुसऱ्या कसोटीत एका अनोक्या विक्रमाची नोंद केली. भारतासाठी विनिंग शॉट लावणारा तो सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला असून जगात दुसरा आहे. विश्वविक्रमाची नोंद ही ऑस्ट्रेलियाच्या पैट कमिंग्सच्या नावावर आहे. त्याने १८ वर्ष आणि १९८ दिवस या वयात ऑस्ट्रेलियासाठी विनिंग शॉट लावला असून शॉने १८ वर्ष आणि ३३९ दिवसात ही किमया केली.

KL राहुलची या विक्रमात मदद

सलामीवीर KL राहुलची शॉच्या या विक्रमात मोलाचा वाटा आहे. भारताला जिंकण्यासाठी जेव्हा अवघ्या एका धावाची गरज होती तेव्हा राहुल क्रीजवर होता. परंतु त्याने ४ चेंडू खेळून काढत पृथ्वी शॉला तो एक रन काढण्याची संधी दिली. राहुलच्या या खिलाडूवृत्तीची सुद्धा खूप प्रसंशा केली जात आहे.

पहा भारताच्या मालिका विजयाचा क्षण

विराट आणि रवि शास्त्रींकडून तारीफ

पृथ्वी शॉच्या या दिमाखदार कामगिरीची दखल कर्णधार विराट कोहली आणि कोच रवि शास्त्रीने सुद्धा घेतली. कोहलीने शॉच्या फलंदाजीचं कौतुक करत आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुद्धा तो अशीच कामगिरी करेल ही आशा व्यक्त केली. तर शास्त्रीने त्याची तुलना सचिन तेंडूलकर आणि वीरेंदर सेह्वागशी केली.