क्रिकेटर पृथ्वी शॉ याचे आठ महिन्यांसाठी निलंबन, कफ सिरप मधून डोपिंग केल्याप्रकरणी BCCI ची कठोर कारवाई
File Image | पृथ्वी शॉ | Indian Cricket Team | (Photo Credits: Getty Images)

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) मंगळवारी, 30 जुलै ला क्रिकेटर पृथ्वी शॉ (Prithvi  Shaw)  याच्यावर डोपिंग (Doping)  केल्याप्रकरणी आठ महिन्यासाठी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. पृथ्वी याने साधारणतः कफ सिरप मध्ये आढळणाऱ्या एका प्रतिबंधित उत्तेजक पदार्थाचे सेवन केले होते.प्राप्त माहितीनुसार, इंदोर मध्ये 22 फेब्रुवारी 2019 रोजी सैयद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सामान्य दरम्यान बीसीसीआयने डोपिंग विरोधी परीक्षण कार्यक्रम घेतला होता ज्यामध्ये पृथ्वी याची सुद्धा चाचणी करण्यात आली होती, त्यामद्ये त्याच्या शरीरात ‘टर्ब्यूटलाइन' नामक पदार्थ असल्याचे समोर आले. यातूनच त्याने या पदार्थाचे सेवन केल्याचा प्रकार उघडकीस आला. हा पदार्थ जागतिक डोपिंग विरोधी एजन्सीच्या प्रतिबंधित पदार्थांचं यादीत समाविष्ट असल्याने बीसीसीआयने त्याच्याविरुद्ध ही कठोर कारवाई केली आहे.

ANI ट्विट

बीसीसीआयच्या माहितीनुसार, 16 जुलै ला डोपिंग विरोधी नियमाच्या कलम 2.1 अंतर्गत पृथ्वी शॉवर नियम उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर त्याने स्वतःच या आरोपाची पुष्टी करत आपण या पदार्थाचे सेवन केल्याचे कबुल केले आहे. त्याच्याशी चर्चा करूनच बोर्डाने त्याच्यावर आठ महिन्याचे निलंबन लादले आहे.

दरम्यान, टीम इंडियासाठी भावी सलामीवीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पृथ्वी शॉ याच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत. त्याने रणजी ट्रॉफी दरम्यान आपल्या राज्यासाठी खेळात असताना त्याने कित्येक सामन्यात शतके लगावली होती. तर वेस्ट इंडिज सोबत झालेल्या टेस्ट सिरीज मधील दोन सामन्यात त्याने शतक व एक अर्धशतक लगावून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र यंदा टीम इंडियाच्या विश्वचषक दौऱ्यात किंवा सध्या सुरु असलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याला वगळण्यात आले होते.