टी-20 वर्ल्ड कप स्थगित करून IPL चे आयोजन करण्यावर PCB नाखुश, ICC ला समर्थन देण्यास दिला नकार
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा लोगो | (Photo Credits- Twitter @TheRealPCB)

आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या (World Cup) आयोजनाबद्दल अनेक दिवसांपासून वेगवेगळे वृत्त समोर येत आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता यंदा आयसीसी (ICC) गुरुवारी, 28 मे रोजी होणाऱ्या बैठकीत ऑस्ट्रेलियामध्ये होणारी स्पर्धा पुढे ढकलेल असे मानले जात आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यास सहमत नाही. यंदाचे वर्ल्ड कप पुढे ढकलण्यास विरोध करणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) म्हटले की ऑस्ट्रेलियामध्ये होणारे टी-20 वर्ल्ड कप 2021 पर्यंत पुढे ढकलण्यास ते पाठिंबा देणार नाही कारण असे केल्याने संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट दिनदर्शिकेवर परिणाम होईल. गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची बैठक होणार असून यामध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेचे भविष्य निश्चित केले जाईल. पीसीबीच्या एका अधिका्याने या बैठकीपूर्वी सांगितले की सर्व गोष्टी उघड होईपर्यंत ते थांबतील. (टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनावर 2022 पर्यंत स्थगिती निश्चित, उद्या ICC च्या बैठकीत मोठ्या घोषणेची शक्यता)

“आम्ही मे मध्ये आहोत आणि अजून वेळ आहे. आयसीसीच्या सदस्यांनी थांबावे आणि कोरोना व्हायरस कोठे आहे हे पाहावे. दोन महिन्यांनंतरही हा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेता येईल," असे ते म्हणाले. आयसीसी बोर्ड पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये टी-20 किंवा 2022 पर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो अशा बातम्या माध्यमांत आल्या आहेत कारण पुढील वर्षी भारतात टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन केले जाणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाला (BCCI) आयपीएल (IPL) आयोजित करण्यासाठी संभाव्य विंडो देऊन यंदा आशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलल्याच्या वृत्तामुळे बोर्ड खूश नसल्याचे पीसीबीच्या सूत्रांनी सांगितले.

“आयपीएल हा बीसीसीआयचा घरगुती कार्यक्रम आहे आणि आयसीसी कार्यक्रम किंवा द्विपक्षीय करारांपेक्षा त्यास प्राधान्य दिले जाऊ शकत नाही. पाकिस्तान अशा कोणत्याही निर्णयाला पाठिंबा देणार नाही," असे एका सूत्रांनी सांगितले. परंतु पीसीबीने यावर्षी आशिया चषक आणि टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा न घेतल्यास क्रिकेट उपक्रम राबविण्याच्या योजनेवर आधीच काम करत असल्याचे त्याने कबूल केले. यंदा आयपीएलचे आयोजन न झाल्यास सुमारे 4,000 कोटींचा तोटा होईल असे बीसीसीआयने म्हटले आहे.