भारत-पाकिस्तान (Photo Credits: Getty Images)

पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) ही जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठे प्रतिस्पर्धा आहे. जेव्हा-जेव्हा दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर एकमेकांशी भिडतात तेव्हा जगभरातील लाखो चाहते त्यांच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर चिपकलेले असतात. मात्र, 2013 पासून भारत-पाकिस्तानमध्ये 7 वर्षाहून अधिक काळ द्विपक्षीय क्रिकेट खेळलेले नसल्याने या दोन्ही संघांच्या चाहत्यांची मात्र निराशा झाली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष एहसान मनी यांनी नुकतीच भारताशी द्विपक्षीय क्रिकेट पुन्हा सुरू होण्याच्या शक्यतेविषयी खुलासा केला आणि पीसीबी खेळायला सदैव तत्पर असल्याचे पुन्हा सांगितले. तथापि, दोन देशांमधील द्विपक्षीय क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी बीसीसीआयला (BCCI) खात्री पटवून देण्यासाठी पीसीबी त्यांच्या मागे धावणार नाही असा आग्रहही मनी यांनी धरला. दोन देशांमधील वाढत्या राजकीय तणावामुळे भारत-पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मालिका खेळल्या गेल्या नाहीत. (भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका जागतिक क्रिकेटसाठी चांगली, पण भारत सरकारमुळे खेळली नाही; PCB अध्यक्ष एहसान मनीचे विधान)

“पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष या नात्याने मी एक निर्णय घेतला आहे. आम्ही भारतासोबत क्रिकेट मालिका खेळण्यास तयार आहोत, मात्र यासाठी आता आम्ही तुमच्या मागे धावणार नाही. पाकिस्तानसोबत क्रिकेट कधी खेळायचं हा आता त्यांचा प्रश्न आहे,” क्रिकेट ऑथर पीटर ओब्रोन आणि रिचर्ड हेलर यांच्या पॉडकास्टमध्ये बोलत असताना मनी यांनी बोर्डाची भूमिका स्पष्ट केली.  भारत-पाकिस्तानमध्ये अखेरीस 2013 मध्ये द्विपक्षीय मालिका खेळली तेव्हा पाकिस्तान 2 टी-20 आणि तीन वनडे सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर आला होता.

त्यानंतर दोन्ही संघ फक्त आशिया चषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि विश्वचषक अशा आयसीसीच्या प्रमुख स्पर्धांमध्ये आमने-सामने आले. आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2019 च्या ग्रुप सामन्यात दोन्ही संघात टक्कर झाली ज्यात भारताने डकवर्थ-लुईस नियमानुसार 89 धावांनी विजय मिळवला आणि पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड कप सामन्यात अपराजित राहण्याचा रेकॉर्ड कायम ठेवला. शिवाय, यंदा अशिया चषक आणि टी-20 विश्वचषकात या दोन्ही संघांची भेट होणार होती पण कोरोना व्हायरसमुळे दोन्ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.