भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी काहीशी वाईट बातमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (International Cricket Council) ने भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्डला (Board of Control for Cricket in India) अल्टीमेटम दिलं आहे. 2016 च्या टी20 वर्ल्डकपसाठी कर म्हणून भरलेले 160 कोटी परत न केल्यास 2023 च्या वर्ल्डकपचे आयोजन भारतात होऊ देणार नाही, अशी तंबी आयसीसीने बीसीसीआयला दिली आहे. ही रक्कम भरण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
2016 मध्ये भारतात टी-20 विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन बीसीसीआयने केल्याने त्यातील कराची जबाबदारी संपूर्णपणे बीसीसीआयची होती. त्यात कराची एकूण रक्कम 160 कोटी होती. त्यामुळे बीसीसीआयने कराची संपूर्ण रक्कम परत करावी, असे आयसीसीने सुनावले आहे. ही रक्कम न भरल्यास भारताला 2023 च्या विश्वचषकाचे यजमानपद गमवावे लागेल, असे सांगण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्डाचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी सांगितले की, जर BCCI पैसे परत करु न शकल्यास 2021 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2023 वर्ल्डकपचे आयोजन भारतात करू देणार नाही असं आयसीसीने सुनावलंही आहे. तसंच बीसीसीआयच्या या वर्षीच्या उत्पन्नातून ही रक्कम आयसीसी वसूल करू शकतं याची आठवण ही बीसीसीआयला करून देण्यात आली आहे. आयसीसीच्या या निर्णयानंतर बीसीसीआय नेमके काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.