विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यूएईमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर तो या पदावरून पायउतार होईल. तथापि तो कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून कायम राहील. महेंद्र सिंह धोनीने कर्णधार पद सोडल्यानंतर विराटने 2017 मध्ये मर्यादित षटकांमध्ये भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. आता जवळपास चार वर्षे टी-20 संघाची कमान सांभाळल्यानंतर तो या जबाबदारीतुन मुक्त होत आहे. कोहलीने 45 टी -20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि त्यापैकी 29 जिंकले. पण आता विराट कर्णधारपद सोडल्यानंतर पुढील कर्णधार कोण असेल या प्रश्नाची सध्या चर्चा होऊ लागली आहे. टीम इंडियाच्या (Team India) मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) नाव सध्या आघाडीवर आहे. तथापि दोन युवा खेळाडूंमध्येही भरपूर दम आहे आणि ते टी-20 संघाचे नवीन कर्णधारपदाचे दावेदार असू शकतात. (Virat Kohli to Step Down: विराट कोहलीची घोषणा- 'दुबईमधील T-20 विश्वचषकानंतर सोडणार संघाचे कर्णधारपद')
केएल राहुल
रोहित शर्माच्या जागी टीम इंडियामध्ये आणखी एक खेळाडू आहे, ज्याला बीसीसीआय टी-20 कर्णधार बनवू शकते आणि तो आहे केएल राहुल (KL Rahul). राहुल हा एक वरिष्ठ खेळाडू देखील आहे आणि त्याने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे कर्णधारपद चांगले सांभाळले आहे. जर बीसीसीआयने इतर संघांप्रमाणे प्रत्येक फॉरमॅटसाठी कर्णधाराची निवड केली तर राहुल देखील एक मोठा दावेदार आहे. राहुल चांगले यष्टीरक्षण देखील करतो आणि यष्टीरक्षक जर कर्णधाराची भूमिका बजावतो तर त्याला खेळ अधिक समजतो.
रिषभ पंत
टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) कडेही चांगला कर्णधार बनण्याची क्षमता आहे. पंतने बऱ्याच काळापासून भारतीय संघात स्वतःला प्रस्थापित केले आहे. आणि निवडकर्ते माजी कर्णधार एमएस धोनीप्रमाणे पंतचा उपयोग करू शकतात. पंत धोनीसारखा यष्टीरक्षक आहे आणि त्याला विकेटच्या मागून खेळाची चांगली समज आहे. तसेच आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यात पंतने दिल्ली कॅपिटल्सचे प्रभावी नेतृत्व केले असून दिल्ली सध्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे आणि यावर्षी आयपीएल जिंकण्याचाही मोठा दावेदार आहे. भविष्याकडे पाहता त्याच्यावर दाव लावला जाऊ शकतो. विशेषसा 2007 मध्ये जेव्हा धोनी कर्णधार बनला तेव्हा त्याला अनेक ज्येष्ठ खेळाडूंच्या वर प्राधान्य देण्यात आले होते.