MI (Photo Credit - X)

DC vs MI, TATA IPL 2025 29th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 29 वा सामना आज म्हणजेच 13 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (DC vs MI) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव केला आहे. दरम्यान, या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईने दिल्लीसमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पण लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीचा संघ दहा विकेट गमावून 193 धावा केल्या.

तिलक वर्माची 59 धावांची दमदार खेळी

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकांत पाच गडी गमावून 205 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्माने सर्वाधिक 59 धावा केल्या. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, तिलक वर्माने 33 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकार मारले. तिलक वर्मा व्यतिरिक्त, सलामीवीर रायन रिकेल्टनने 41 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून विप्रराज निगम आणि कुलदीप यादव यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. विप्राज निगम आणि कुलदीप यादव यांच्याव्यतिरिक्त मुकेश कुमारने एक विकेट घेतली.

करुण नायरची वादळी खेळी वाया

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ 19 षटकांत फक्त 193 धावा करून सर्वबाद झाला. दिल्ली कॅपिटल्सकडून स्टार फलंदाज करुण नायरने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान, करुण नायरने 40 चेंडूत 12 चौकार आणि पाच षटकार मारले. करुण नायरशिवाय अभिषेक पोरेलने 33 धावा केल्या. त्याच वेळी, स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहरने मुंबई इंडियन्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. मुंबई इंडियन्सकडून कर्ण शर्माने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. कर्ण शर्मा व्यतिरिक्त मिचेल सँटनरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.