IPL मध्ये षटकारांची आतषबाजी करण्यात ‘हा’ संघ पटाईत; तर MS Dhoni आहे 20व्या षटकाचा सिकंदर, पोलार्ड आणि ‘हिटमॅन’ रोहित शर्माही मागे नाही
एमएस धोनी आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 15 वा हंगाम 26 मार्चपासून सुरू होणार आहे. क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या लीगमध्ये लांब षटकार मारणे सामान्य आहे. आयपीएलच्या 14 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या नावावर आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी सर्व संघांनी आपले कंबरडे कसले आहे. यावेळी मैदानावर चौकार-षटकारांचा आतषबाजी पाहण्यासाठी स्वतः चाहते देखील स्टेडियममध्ये उपस्थित असणार आहेत. आयपीएलच्या (IPL) गेल्या मोसमात सर्व संघांनी एकूण 687 षटकार ठोकले होते. त्यापैकी चॅम्पियन चेन्नईच्या फलंदाजांनी एकूण 115 षटकार खेचले. अशा स्थितीत यावेळीही चाहत्यांना मोठ्या प्रमाणात खेळाडू षटकार मारताना दिसतील अशी अपेक्षा आहे. यादरम्यान, आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणत्या संघाच्या नावावर आहे ते जाणून घेऊया. (IPL मध्ये ‘या’ संघाकडून झळकावली गेली सर्वाधिक शतके, तर गेल्या 13 हंगामापासून KKR शतकासाठी आसुसला)

आयपीएलच्या 14 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हिटमॅन रोहित शर्माच्या  (Rohit Sharma) नेतृत्वातील मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. मुंबईच्या खेळाडूंनी 217 सामन्यांमध्ये एकूण 1,308 षटकार ठोकले आहेत. तर या बाबतीत विराट कोहलीचे रॉयल चॅलेंजर्स दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आरसीबी (RCB) खेळाडूंनी 211 सामन्यांमध्ये 1,275 षटकार मारले आहेत. तसेच एकही आयपीएल विजेतेपद न जिंकलेल्या पंजाब फ्रँचायझीसाठी सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे ते या विशेष यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मोहालीस्थित फ्रँचायझीने 204 सामन्यांमध्ये 1,166 षटकार ठोकले आहेत. तर चार वेळा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) 194 डावांमध्ये 1,165 षटकारांसह चौथ्या क्रमांकावर आहे.या यादीत कोलकाता नाईट रायडर्स पाचव्या तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ सहाव्या स्थानावर आहे. केकेआरच्या खेळाडूंनी आतापर्यंत 1113 षटकार तर दिल्ली खेळाडूंनी 1041 षटकार खेचले आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स 874 आणि सनरायझर्स हैदराबाद 680 षटकारांसह आठव्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, या लीगमध्ये काही फलंदाज अशा पद्धतीने खेळतात की ते 20 व्या षटकापर्यंत टिकून राहिल्यास ते गोलंदाजांना धुधू.. धुतात. कोणत्याही डावात 20वे षटक सर्वात महत्त्वाचे असते. आणि शेवटच्या षटकात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे  (MS Dhoni) नाव आघाडीवर आहे. आयपीएलच्या 20व्या षटकात 50 षटकार मारणारा धोनी पहिला खेळाडू आहे. तर आयपीएलमध्ये किरॉन पोलार्ड याने आतापर्यंत डावाच्या शेवटच्या षटकात एकूण 30 षटकार ठोकले आहेत. तसेच 20व्या षटकात षटकार मारणाऱ्यांच्या यादीत पोलार्डचा मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्माही तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने शेवटच्या षटकात आतापर्यंत 23 वेळा षटकार मारले आहेत.