इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 हंगामाच्या सलामीच्या सामन्याच्या 48 तासांपूर्वी दिग्गज कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देत आपण कर्णधार म्हणून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. यासोबतच धोनीनंतर भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचं आता चेन्नई सुपर किंग्सचा पुढील कर्णधार म्हणून नाव जाहीर केलं. CSK त्यांच्या आयपीएल (IPL) 15 च्या मोहिमेची सुरुवात 26 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध करेल. आयपीएल 15 चा सलामीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. एमएस धोनी (MS Dhoni) 2007 च्या पहिल्या सत्रापासून संघासोबत आहे. तर त्याने सुरुवातीपासूनच संघाचे नेतृत्व केले आहे. अशाप्रकारे आता धोनीने कर्णधार म्हणून आपला अखेरचा सामना आयपीएल 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरोधात खेळला. (CSK Likely Playing XI, IPL 2022: ऋतुराज गायकवाड सोबत सलामीसाठी खतरनाक खेळाडूला पदार्पणाची संधी, KKR विरुद्ध ‘या’ 11 खेळाडूंना मिळू शकते पहिली पसंती)
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून 4 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या एमएस धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे, तथापि तो आयपीएल 2022 मध्ये सीएसकेकडून मैदानात उतरणार आहे. धोनी आयपीएलच्या इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध धोनीने आयपीएलच्या सुरुवातीपासून कर्णधार म्हणून एकूण 204 सामने खेळले आहेत. ‘थाला’ धोनीने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत चेन्नई सुपर किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे नेतृत्व केले आहे. याशिवाय धोनीने या सामन्यांमध्ये 40.88 च्या सरासरीने 137.36 च्या सरासरीने 4,456 धावा केल्या आहेत. आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी धोनीला सुपर किंग्सने 12 कोटी रुपयात रिटेन केले आणि आता तो जडेजाच्या नेतृत्वात एक खेळाडू खेळले.
दरम्यान, धोनीच्या अखेरच्या सामन्याबद्दल बोलायचे तर KKR विरुद्ध आयपीएल 2021 फायनलमध्ये धोनीने यशस्वीरीत्या चौथे विजेतेपद संघाच्या झोळीत पाडले. धोनीला या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण कर्णधार म्हणून पुन्हा एकदा ठसा उमटवण्यात तो यशस्वी ठरला. उल्लेखनीय म्हणजे, धोनीने स्पर्धेच्या इतिहासातील विक्रमी नऊ आयपीएल फायनलमध्ये CSK चे नेतृत्व केले आहे. धोनीने 204 सामन्यात चेन्नई संघाचे नेतृत्व करत 121 सामने जिंकले, 82 गमावले आणि एक सामना अनिर्णित राहिला. तसेच त्याची विजयी टक्केवारी 59.60% आहे.