एमएस धोनी श्रीनगर साठी रवाना, काश्मीर येथे आर्मीच्या 106 व्या पॅराशूट बटालियनमध्ये होणार सामील
एमएस धोनी (Photo Credit: IANS)

इंडियन क्रिकेट टीम (Indian Cricket Team) चा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) भारतीय सैन्यात दाखल होण्यासाठी श्रीनगर साठी रवाना झाला आहे. धोनी नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून श्रीनगरसाठी रवाना झाला. धोनी 31 जुलै रोजी काश्मीरमध्ये तैनात असलेल्या टेरिटोरियल आर्मी (Territorial Army) च्या 106 व्या पॅराशूट बटालियनमध्ये सामील होणार आहे. याआधी आर्मीकडून सांगण्यात आले होते की, लेफ्टिनेंट कर्नल (ऑनरेरी) एमएस धोनी 31 जुलै ते 15 ऑगस्ट 2019 पर्यंत आपल्या बटालियनमध्ये काम करतील. (स्टार क्रिकेटर MS Dhoni यांची काश्मीर येथे पोस्टिंग; आर्मीच्या 106 व्या पॅराशूट बटालियनमध्ये होणार सामील)

धोनीचे भारतीय सैन्यासाठीचे प्रेम लपून राहिले नाही. धोनीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होती की, लहानपणापासूनच त्यांना सैन्यात भरती व्हायचे होते. 2015 मध्ये धोनीने स्पेशल फोर्ससोबत आपले ट्रेनिंग पूर्ण केले होते. 2015 मध्ये त्यांनी पॅराट्रूपर्सच्या विमानातून 5 उडी घेतली होती. यातील एक उडी तब्बल 1200 फुट उंचावरून घेतली होती. त्यावेळीही त्यांनी पॅराट्रूपर्स सोबत 12 दिवसांचे प्रशिक्षण घेतले होते.

टीम इंडियाच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यावर न जात धोनीने दोन महिने भारतीय सैन्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. विश्वचषकमधील त्याच्या संथ खेळीनंतर धोनीने खेळातून निवृत्ती घ्यावी अशी चाहते आणि विशेषज्ञाकडून मागणी केली जात होती. मात्र, धोनीने हे सर्व ने जुमानता दोन महिने खेळापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.