कीरोन पोलार्ड (Photo Credit: PTI)

MI vs SRH IPL 2021 Match 9: आयपीएल (IPL) गतविजेत्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) गाडी अखेर पटरीवर परतली आहे. चेपॉक स्टेडियमवर नुकत्याच संपुष्टात आलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 9व्या सामन्यात मुंबईने 13 धावांनी हैदराबादवर विजय मिळवला. मुंबईकडून गोलंदाजांनी आजच्या सामन्यात अचूक कामगिरी केली ज्यामुळे सनरायझर्स 137 धावांपर्यंतच मजल मारू शकले. मुंबईकडून राहुल चाहर आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. तथापि 3 महत्वपूर्ण खेळाडूंच्या मैदानावरील कामगिरीने संघाला विजय मिळवण्यात यश आले आणि संघाचे गेम चेंजर बनले. बॅट, बॉल आणि आपल्या क्षेत्ररक्षणाने हैदराबादला चेपॉक सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जाण्यास भाग पाडले. (MI vs SRH IPL 2021 Match 9: हैदराबादच्या ‘ऑरेंज आर्मी’चा फ्लॉप शो सुरूच, चेपॉकवर गमावला सलग तिसरा सामना; मुंबईने हिसकावला विजयाचा घास!)

1. कीरोन पोलार्ड (Kieron Pollard)

मुंबई इंडियन्सच्या या तडाखेबाज अष्टपैलूने हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारच्या डावातील अखेरच्या ओव्हरमध्ये षटकार खेचत 17 धावा लुटल्या ज्यामुळे मुंबईने निर्धारित ओव्हरमध्ये 150 धावांपर्यंत मजल मारली. पोलार्डची खेळी संघासाठी नक्कीच महत्वपूर्ण ठरली कारण अखेरीस सनरायझर्स 137 धावांचा टप्पा गाठण्यात यशस्वी ठरले होते.

2. हार्दिक पांड्या (Hardik Pandya)

टीम इंडियाच्या या युवा अष्टपैलूने पुन्हा एकदा आपल्या क्षेत्ररक्षणाने चाहत्यांचे मन जिंकले. हार्दिकने सामन्यात दोन रनआऊट केले ज्यातील हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरचे सर्वात मोठे ठरले. वॉर्नर स्वबळावर संघाला विजय मिळवून देण्यात सक्षम आहे आणि असे झाल्यास मुंबईला नक्कीच पराभव पत्करावा लागला असता.

3. राहुल चाहर (Rahul Chahar)

चाहर बंधूमधील धाकटा राहुल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. राहुलने सलग दुसऱ्या सामन्यात दोनपेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. आजच्या सामन्यात देखील त्याने आपल्या फिरकीची जादू दाखवली आणि मनीष पांडे, विराट सिंह व अभिषेक शर्मा यांच्यासारख्या मोठे फटके खेळण्यात शक्ष्म फलंदाजांना स्वस्तात तंबुत धाडलं. राहुलच्या फिरकीने हैदराबादवरील दबाव कायम ठेवण्यात संघाला यश आले.