SRH Playing XI vs MI IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीग (Indian Premier League) 2021 च्या 28 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा 55 धावांच्या फरकाने पराभव केला. पहिले फलंदाजी करत राजस्थानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 220 धावांचा डोंगर उभारला ज्याच्या प्रत्युत्तरात सनरायझर्स संघ निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 गडी गमावून 165 धावा करू शकला. सामन्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) डेविड वॉर्नरला (David Warner) राजस्थान रॉयल्सविरुद्ध इलेव्हनमधून बाहेर काढण्याबाबत मौन सोडले आणि म्हणाला, वॉर्नर हा जागतिक दर्जाचा खेळाडू असून सनरायझर्स टीम मॅनेजमेंट त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतण्याबाबत बरीच चर्चा करेल. ऑरेंज आर्मीने केलेल्या भयानक कामगिरीनंतर 4 मे रोजी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध सामन्यात वॉर्नरला हैदराबादच्या इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. (RR vs SRH IPL 2021: बुडत्याचा पाय खोलात! SRH पराभवातून पराभवाकडे; राजस्थान रॉयल्सच्या भेदक गोलंदाजीसमोर हैदराबादचा 55 धावांनी पराभूत)
विशेष म्हणजे, शनिवारी सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार म्हणून हकालपट्टी झालेल्या वॉर्नरला रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या इंडियन प्रीमियर लीग 2021 सामन्यासाठी हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. “राजस्थानकडून अपवादात्मक फलंदाजी, परंतु आम्हाला काही गोष्टी सुधारण्याची आवश्यकता आहे. गटात अनेक नेते आणि आम्ही बरोबर राहणे महत्वाचे आहे. तो एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे आणि मला खात्री आहे की बरीच चर्चा केली जाईल [वॉर्नर कधीतरी इलेव्हनमध्ये परत येईल का?],” नवनियुक्त सनरायझर्स कर्णधार केन विल्यमसनने सामन्यानंतरच्या सादरीकरणात सांगितले. सामन्याबद्दल बोलायचे तर तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 220/3 अशा धावांचा डोंगर उभारला. बटलर आणि सॅमसनने रॉयल्सकडून अनुक्रमे 124 आणि 48 धावांची तुफान खेळी केली. हैदराबादकडून राशिद खान, संदीप शर्मा आणि विजय शंकरने प्रत्येकी 1 विकेट काढली.
राजस्थान रॉयल्सविरुद्ध आजच्या सामन्यात वॉर्नरला हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळू शकली नाही. त्याच्या जागी परदेशी खेळाडू म्हणून मोहम्मद नबीला संघात स्थान देण्यात आले, पण त्यालाही काही खास कामगिरी करता आली नाही. नबीने त्याच्या 1 ओव्हरमध्ये 21 धावा लुटल्या तर त्याला बॅटने देखील कमाल दाखवता आली नाही. नबीने 5 चेंडूत 17 धावा केल्या.