MI vs KKR, IPL 2020: कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत दिलेल्या 149 धावांच्या प्रत्युत्तरात एमआयने (MI) 2 विकेट गमावून केकेआरवर मात केली आणि 19 चेंडू शिल्लक असताना 8 विकेटने नाईट रायडर्सचा धुव्वा उडवला. गतजेत्या मुंबईकडून आजच्या सामन्यात सलामी फलंदाज क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) दमदार अर्धशतक ठोकले आणि नाबाद 78 धावा केल्या. रोहित शर्माने 35, हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) नाबाद 21, सूर्यकुमार यादवने 10 धावांचे योगदान दिले. मुंबईचा 8 सामन्यातील हा सहावा विजय ठरला आणि त्यांनी 12 गुणांसह आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवले. डी कॉकने आजच्या आपल्या डावात 9 चौकार आणि 3 षटकार लागले. डी कॉकचे आयपीएलमधील हे तिसरे अर्धशतक होते. दुसरीकडे, केकेआरकडून (KKR) शिवम मावी आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 1 यश मिळाले. (MI vs KKR, IPL 2020: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सूर्यकुमार यादवने पकडला अफलातून 'स्काय' डायव्हिंग कॅच, पाहून ट्रेंट बोल्टसह चाहतेही अवाक Watch Video)
मुंबईचा सलामीवीर रोहित आणि डी कॉकने पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी करत आपल्या संघाला चांगली सुरुवात दिली. शिवम मावीने ही भागीदारी मोडली आणि रोहितला विकेटकीपर दिनेश कार्तिककडे 35 धावांवर झेलबाद केले. सूर्यकुमार यादव चक्रवर्तीच्या चांदूवर 10 धावांवर बाद झाला. यानंतर डी कॉक आणि हार्दिकने टीमला विजयरेषा ओलांडून दिली. या विजयासह मुंबईने प्ले-ऑफ फेरीच्या दिशेने अजून एक पॉल उचलले आहे. मुंबईऐवजी दिल्ली कॅपिटल्स देखील प्ले-ऑफ गाठण्यासाठी आवडता संघ आहे. यापूर्वी, सुरुवातीच्या पडझडीनंतर इयन मॉर्गन आणि पॅट कमिन्स यांच्या नाबाद अर्धशतकी भागीदारीने मुंबईविरुद्ध सामन्यात कोलकाताचा डाव सावरला आणि त्यांनी 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 148 धावा केल्या. कमिन्सने 36 चेंडूत 53 तर कर्णधार मॉर्गनने 29 चेंडूत 39 धावा केल्या. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या कोलकात्याची सुरुवात खराब झाली. मुंबईच्या गोलंदाजांनी पहिल्यापासूनच नाईट रायडर्सना वारंवार धक्के दिले. 61 धावांवर कोलकाताचा अर्धा संघ तंबूत परतला होता.
मुंबईकडून राहुल चाहरने 4 ओव्हरमध्ये फक्त 18 रन देऊन 2 विकेट घेतल्या. राहुलने या दोन्ही विकेट सलग 2 चेंडूत बाद केल्या. तर ट्रेंट बोल्ट, नॅथन कुल्टर-नाईल आणि जसप्रीत बुमराह यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.