सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

MI vs DC, IPL 2020 Qualifier 1: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिला क्वालिफायर सामना खेळला जात आहे. मुंबईने टॉस गमावून पहिले फलंदाजी केली आणि 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 200 धावांपर्यंत मजल मारली आणि दिल्लीला विजयासाठी 201 धावांचे आव्हान दिले. मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) अर्धशतकी डाव खेळत 51 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने 40, तर ईशान किशनने (Ishan Kishan) नाबाद 55 आणि हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) नाबाद 37 धावांचे योगदान दिले. आयपीएलच्या (IPL) आजच्या महत्वाच्या सामन्यात मुंबईची सुरुवात खराब झाली पण चांगल्या भागीदारीने संघाचा डाव सावरला. मुंबईसाठी आजच्या सामन्यातही कर्णधार रोहित शर्माच्या अपयशाची मालिका सुरूच राहिली. दुसरीकडे, दिल्लीसाठी रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर मार्कस स्टोइनिस आणि एनरिच नॉर्टजे यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IPL 2020: DC विरुद्ध रोहित शर्मा 'गोल्डन डक'वर बाद; मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने केली हरभजन सिंह, पार्थिव पटेलच्या 'नकोशा' रेकॉर्डची बरोबरी)

टॉस गमावून पहिले फलंदाजीला आलेल्या मुंबईला 16च्या धावसंख्येवर पहिला धक्का बसला. अश्विनने रोहितला पहिल्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू बाद करून माघारी धाडलं. यानंतर डी कॉक आणि सूर्यकुमारने डाव सांभाळला. दोघांनी 6 ओव्हरमध्ये 63 धावा केल्या. परंतु, 8व्या ओव्हरमध्ये अश्विनच्या चेंडूवर डि कॉक 25 चेंडूत 40 धावांचा तुफानी डाव खेळून शिखर धवनकडे झेलबाद झाला. सूर्यकुमारने 36 चेंडूत अर्धशतक ठोकले, पण 38 व्या चेंडूवर तो एरिक नॉर्टजेचा शिकार बनला. किरोन पोलार्ड देखील शून्यावर माघारी परतला. कृणाल पांड्या आणि ईशान किशन यांच्यात भागीदारी होत असताना स्टोइनिसने पांड्याला 13 धावांवर डॅनियल सॅम्सकडे कॅच आऊट केले. त्यानंतर ईशान आणि हार्दिकने अखेरच्या तीन ओव्हरमध्ये तुफान बॅटिंग केली. रबाडाच्या अंतिम ओव्हरच्या पहिल्या दोन चेंडूवर हार्दिकने मोठे षटकार चोपले. हार्दिक नाबाद धावा करून परतला. ईशानने अखेच्या चेंडूवर मोठा षटकार ठोकून ३० चेंडूत 55 धावांचा डाव खेळला. ईशानने आपल्या नाबाद अर्धशतकी डावात 4 चौकार आणि 3 षटकार मारले. दुसरीकडे, हार्दिकने 14 चेंडूत 5 षटकाराच्या मदतीने नाबाद 37 धावा केल्या.

दरम्यान, मुंबई आणि दिल्ली यांच्यातील विजयी संघ थेट आयपीएल फायनलमध्ये पोहचेल तर पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम सामन्यासाठी आणखीन एक संधी मिळेल. आजच्या सामन्यात पराभूत होणार संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील विजयी संघाशी खेळेल.