MI vs DC, IPL 2020 Final: मुंबई इंडियन्सचा विक्रमी 'पंच'! रोहित शर्माचा हिटमॅन अवतार, दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेटने  पराभव करून जिंकली आयपीएलची फायनल जंग
मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

MI vs DC, IPL 2020 Final: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier Leageu) 2020 फायनल मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 5 विकेटने पराभव करत मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) विक्रमी पाचवे आयपीएल विजेतेपद जिंकले. दिल्ली कॅपिटल्सने पहिले फलंदाजी करून दिलेल्या 157 धावांच्या लक्ष्याचा प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) धमाकेदार अर्धशतकाच्या बळावर सहज विजय मिळवला. यंदाच्या आयपीएलचे विजेतेपद जिंकताच रोहित स्पर्धेच्या इतिहासातील सर्वत यशस्वी कर्णधार बनला. मुंबईचा कर्णधार म्हणून रोहितचे हे चौथे विजेतेपद ठरले तर खेळाडू म्हणून पाचवे आहे. यापूर्वी रोहित 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळताना अ‍ॅडम गिलक्रिस्टच्या नेतृत्वात पहिल्यांदा आयपीएलचा 'किताब जिंकला होता. मुंबईच्या विजयात रोहितने पुढाकार घेत नेतृत्व केले आणि सर्वाधिक 68 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने 20 तर सूर्यकुमार यादवने 19 धावा केल्या. ईशान किशन नाबाद 33 धावा करून परतला. ('ऑस्ट्रेलियामध्ये भेटू'; Down Under दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल टी नटराजनचे डेविड वॉर्नरने केले अभिनंदन, दिला खास संदेश Watch Video)

दिल्लीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईसाठी डी कॉक आणि रोहितच्या जोडीने तुफान सुरुवात केली. पण, दोघांमध्ये 45 धावांची भागीदारी झाली असताना मार्कस स्टोइनिसने डी कॉकला ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपर रिषभ पंतकडे झेलबाद केलं. त्यानंतर रोहित आणि सूर्यकुमारमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली असताना रोहितने हळूच फटका खेळत चोरटी धाव घेण्यासाठी धावला पण दोन्ही फलंदाजांमध्ये गोंधळ झाला. अखेर रोहित नॉन-स्ट्राईकला पोहोचल्याचं पाहून सूर्यकुमारने आपली क्रीज सोडली आणि स्वत:ला धावबाद करवून घेतलं. दमदार खेळीनंतर रोहित मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ललित यादवकडे झेलबाद होऊन माघारी परतला. मुंबईला 17 चेंडूत 10 धावांची गरज असताना कगिसो रबाडाने पोलार्डला 9 धावांवर माघारी धाडलं. दिल्लीसाठी एनरिच नॉर्टजेने 2 तर स्टोइनिस आणि रबाडा यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

दरम्यान, मुंबई आणि दिल्ली यांच्यातील यंदाच्या हंगामातील हा चौथा सामना होत्या आणि रोहितच्या मुंबईने निर्विवाद वर्चस्व गाजवले आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चौथ्यांदा बाजी मारली. यंदा दिल्ली पहिल्यांदा आयपीएल फायनलमध्ये पोहचली होती, तर मुंबईचा हा सहावा अंतिम सामना होता. विशेष म्हणजे, मुंबईने आजच्या विजयासह आपले विषम वर्षी विजेतेपद जिंकण्याचे सत्र मोडले आणि पहिल्यांदा लागोपाठ दुसरे विजेतेपद जिंकले.