India Women's Cricket Team (Photo Credits: Twitter/ @BCCIWomen)

भारत (India) आणि इंग्लंड (England) महिला संघात आज टी-20 तिरंगी मालिकेतील महत्वाचा सामना खेळला जाईल. पहिल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्या दमदार बॅटिंगच्या जोरावर भारताने विजयी सलामी दिली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसर्‍या सामन्यात निराशाजनक फलंदाजीमुळे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. आता इंग्लंडविरुद्ध टी-20 तिरंगी मालिकेच्या महत्त्वपूर्ण लीग सामन्यात भारतीय महिला संघाला फलंदाजीची समस्या सोडवावी लागेल. यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध मागील सामन्यात मधल्या फळीच्या खराब कामगिरीमुळे भारताचा चार विकेटने पराभव झाला. सलामी फलंदाज स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांना वगळता अन्य भारतीय फलंदाजांना कॅनबेरामध्ये (Canberra) अतिरिक्त बाऊन्सच्या खेळपट्टीवर खेळण्यात अपयश आले. भारताने शेवटच्या सहा विकेट्स 21 धावांच्या मोबदल्यात गमावले. गोलंदाजांनी सामना 19 व्या ओव्हर पर्यंत नेला, पण त्यांना पराभव टाळता आला नाही.

तिरंगी मालिकेतील तिसरा सामना भारत आणि इंग्लंड महिला संघासह होईल. हा सामना मनुका ओव्हल, कॅनबेरामध्ये खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी सुरु होईल. भारतीय चाहते हा सामना Sony Six आणि Sony Six HD वर लाईव्ह पाहू शकतात.

16 वर्षीय शफाली वर्मा 3 चेंडूच खेळू शकली, तर जेमिमाह रॉड्रिग्सचा डाव 11 चेंडूत 1 धाव करून संपुष्टात आला. अनुभवी मंधाना आणि हरमनप्रीतने 40 धावांची भागीदारी केली. मधल्या फळीतील महत्वाची फलंदाजी म्हणजे वेदा कृष्णमूर्तीला सलग दोन अपयशानंतर मोठा स्कोअर आवश्यक आहे. दुसरीकडे, इंग्लंडने अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. दोन्ही सामन्यात त्याची फलंदाजी चांगली राहिली आहे. 21 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियामध्ये सुरू होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्‍या या स्पर्धेत या तिन्ही संघांचे दोन गुण आहेत.

असा आहे भारत-इंग्लंड महिला संघ

टीम इंडिया: हर्लीन देओल, स्मृती मंधाना, जेमिमाह रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), वेदा कृष्णमूर्ती, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, तान्या भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, नुझत पारविन, पूजा वस्त्रकर, अरुंधती रेड्डी, शाफाली वर्मा, रिचा घोष.

इंग्लंड: डॅनियल व्याट, अ‍ॅमी एलेन जोन्स (विकेटकीपर), टैमी ब्यूमोंट, हीथर नाइट (कॅप्टन), नताली सायव्हर, कॅथरीन ब्रंट, लॉरेन विनफिल्ड, जॉर्जिया एल्विस, अन्या श्रबसोल, केट क्रॉस, फ्रॅन विल्सन, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, फ्रीया डेव्हिस, मॅडी विलियर्स.