मंगळवार 14 जानेवारी रोजी ऑस्ट्रेलिया (Australia) संघ भारत (India) दौऱ्याची सुरुवात करणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्याची सुरूवात होईल. आरोन फिंच (Aaron Finch) यांच्या नेतृत्वात अतिथी संघ दोन दिवसांपूर्वी मुंबईला (Mumbai) पोहोचला आहे. मालिकेचा दुसरा सामना राजकोट आणि तिसरा सामना बेंगलुरू येथे खेळला जाईल. विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वात टीम इंडिया याक्षणी उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्यांनी सतत मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. अलीकडेच टीम इंडियाने 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत श्रीलंकाविरुद्ध 2-0 ने विजय मिळवला होता. श्रीलंकाविरुद्ध टी-20 मालिका टीम इंडियासाठी सुलभ राहिली असली तरीही, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खूपच आव्हानात्मक असेल. फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने मागील वर्षी भारताला घरच्या मैदानावर खेळत 3-2 असे पराभूत केले होते. अशा परिस्थितीत या वेळी विराट सेना त्या पराभवाचा बदला घेऊ इच्छित आहे. (IND vs AUS: रोहित शर्मा, शिखर धवन आणि केएल राहुल यांचा होऊ शकतो Playing XI मध्ये समावेश, वाचा सविस्तर)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेचा पहिला सामना दुपारी दीड वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सुरू होईल. नाणेफेक दुपारी एक वाजता होईल. भारतीय चाहते हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर, तर लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.
ऑस्ट्रेलिया संघ यंदा मजबूत दिसत आहे. कर्णधार फिंच आणि डेविड वॉर्नर डावाची सुरुवात करतील, तर मधल्याफळीत स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबूशेन जबाबदारी सांभाळतील. लाबूशेनने मागील काही सामान्यांपासून टेस्टमध्ये चांगली कामगिरी केली आहे, आणि आता वनडेमध्ये संधी मिळाल्यास टेस्टच्या फॉर्मची हुबेहूब प्रतिकृती करण्यास इच्छूक असेल. मार्च 2019 मध्ये झालेल्या मालिकेत भारतीय संघाने हैदराबाद आणि नागपूरमधील पहिल्या दोन वनडे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली होती, परंतु त्यानंतरच्या तीन सामन्यात ऑस्ट्रेलियाने जबरदस्त खेळ दाखवत तीनही सामने जिंकून मालिका जिंकली.
असा आहे भारत-ऑस्ट्रेलिया वनडे संघ
भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (विकेटकीपर), केदार जाधव, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, नवदीप सैनी, आणि युजवेंद्र चहल.
ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कॅप्टन), डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), डार्सी शॉर्ट, अॅश्टन टर्नर, जोश हेजलवुड, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, केन रिचर्डसन, अॅडम झँपा, अॅस्टन अगार, पीटर हैंडस्कोम्ब.