शुभमन गिल (Photo Credit: PTI)

सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) 20 ओव्हरमध्ये 143 धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाता नाइट रायडर्सने (Kolkata Knight Riders) 7 विकेटने विजय मिळवला. यासह इंडियन प्रीमिअर लीगच्या 13व्या हंगामात हैदराबादने सलग दुसरा सामना गमावला, तर कोलकाताचा हा पहिला विजय आहे. हैदराबादकडून मनीष पांडेने (Manish Pandey) केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ गेली. 38 चेंडूत पांडेने 51 धावा केल्या. मनीषच्या अर्धशतकी डावाच्या प्रत्युत्तरात केकेआरकडून (KKR) शुभमन गिलने (Shubman Gill) नाबाद 70 धावांचा डाव खेळला आणि टीमला विजयी रेषा ओलांडून दिली. केकेआरकडून शुभमनव्यतिरिक्त नितीश राणाने 26 धावा केल्या, तर इयन मॉर्गन (Eoin Morgan) 42 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, हैदराबादकडून खालील अहमद, टी नटराजन आणि रशीद खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. दरम्यान, आजच्या सामन्यात हैदराबादने टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र कोलकाताच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी केली आणि हैदराबादला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. (KKR vs SRH, IPL 2020: 2018मध्ये खरेदी केलेल्या कमलेश नागरकोटीने 2 वर्षानंतर KKRकडून केले डेब्यू, जाणून त्याच्याबद्दल माहित नसलेल्या 'या' गोष्टी)

केकेआरकडून फलंदाजी करताना सुनील नारायण आणि कर्णधार दिनेश कार्तिक शून्यावर बाद झाले. मात्र, सलामी फलंदाज शुभमन गिल अखेरपर्यंत टिकून राहिला आणि टीमचा विजय निश्चित केला. गिल आणि मॉर्गनच्या जोडीने विजयी भागीदारी केली. मॉर्गनने 29 चेंडूत 42 धावा केल्या. हैदराबादने दिलेले आव्हान केकेआरने 12 चेंडू शिल्लक असताना गाठले.  दरम्यान, हैदराबादने टॉस जिंकत पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हैदराबादकडून पांडे वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. हैदराबादकडून मनीषने अर्धशतकी खेळी केली. कोलकाताच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी केली. पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दुसरीकडे, पहिले फलंदाजी करताना हैदराबादला चांगली सुरुवात करता आली नाही. वॉर्नर-जॉनी बेअरस्टो यांनी 24 धावांची भागीदारी केली. त्यानंतर बेअरस्टो 5 धावांवर बाद झाला. तर वॉर्नर 36 धावांवर बाद झाला. रिद्धिमान साहा 30 धावा करत धावबाद झाला. हैदराबादकडून पांडेने 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 38 चेंडूत सर्वाधिक 51 धावा केल्या. आजच्या सामन्यात वॉर्नरने मागील अनेक सामान्यांपासून सुरु असलेली परंपरा मोडली आणि टॉस जिंकून पहिले फलंदाजी निवडली, पण टीम कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवू शकली नाही.