IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 साठी खेळाडूंचा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगलोर येथे होणार आहे. आयपीएलच्या (IPL) या लिलावाला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असून सर्व फ्रँचायझी तयारीला लागले आहेत. भारतीय खेळाडूंपासून विदेशी खेळाडूंवर गेल्या काही वर्षांत फ्रँचायझींनी दोन्ही हातांनी मोठी रक्कम उधळली आहे. आतापर्यंत झालेले आयपीएलचे सर्व लिलाव (IPL Auctions) रंगतदार झाले असून काही गोष्टी धक्कादायक नक्कीच पाहायला मिळाल्या. अनेक खेळाडू कोट्याधीश बनले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही मोठी नावे अनसोल्ड राहिली. या लिलावात आतापर्यंत सर्वात महागडे ठरलेल्या पहिल्या पाच खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे आहेत. (IPL 2022 Mega Auction: आयपीएल लिलावापूर्वी वाढली श्रेयस अय्यरची डिमांड, RCB समवेत दोन लावू शकणार मोठी बोली)
1. क्रिस मॉरिस - 16.25 कोटी
दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस इंडियन प्रीमियर लीग (IPL) लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मॉरिसला आयपीएल 2021 च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मॉरिस बॅट आणि बॉलने काही कमाल करू शकला नसला तरी दक्षिण आफ्रिकेच्या तडाखेबाज अष्टपैलूने नवा विक्रम प्रस्थापित केला.
2. युवराज सिंह - 16 कोटी
भारताचा माजी वर्ल्ड कप विजेता युवराज सिंहला 2015 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने तब्बल 16 कोटी रुपयांत ताफ्यात सामील केले. युवराजला आयपीएल 2014 च्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 14 कोटी रुपयांना विकत घेतले.
3. पॅट कमिन्स - 15.5 कोटी
ऑस्ट्रेलियाचा विद्यमान कसोटी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला आयपीएल 2021 लिलावात दोन वेळचे आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने 15.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
4. बेन स्टोक्स - 14.5 कोटी
इंग्लंडचा तडाखेबाज अष्टपैलू बेन स्टोक्सचे नाव या यादीत पाहून चकित होऊ नका. स्टोक्स आतापर्यंत दोन आयपीएल संघांकडून खेळला आणि दोन्ही वेळेस त्याच्यासाठी फ्रँचायझींनी कोटींची बोली लावली. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू स्टोक्ससाठी 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंटने 14.5 कोटी रुपयांची बोली लावली. तर पुढील वर्षी स्टोक्स 12.5 कोटी रुपयांमध्ये राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात सामील झाला.
5. ग्लेन मॅक्सवेल 14.25 कोटी
मॅक्सवेलचा ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या स्टार खेळाडूंमध्ये समावेश आहे. गेल्या हंगामात मॅक्सवेलला चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण त्यानंतर भारताविरुद्ध सामन्यांमध्ये मॅक्सवेलने चमकला, ज्यामुळे त्याचा लिलावात त्याचा भाव चांगलाच वधारला. मॅक्सवेलची बेस प्राइज ही 2 कोटी रुपये होती. पण यावेळी आरसीबीच्या संघाने मॅक्सवेलसाठी तब्बल 14 कोटी 15 लाख रुपये मोजले.
दरम्यान, आयपीएलच्या पहिल्याच लिलावात एमएस धोनी हा सर्वात महागडा खेळाडू होता. चेन्नई सुपर किंग्सने टी-20 वर्ल्ड कप 2007 विजेत्या कॅप्टनसाठी 9.5 कोटी रुपये मोजले होते. आणि तेव्हापासून, तो चेन्नई संघासोबत असिन त्यांना चार आयपीएल विजेतेपद मिळवून दिले आहे.