IPL 2022, RR vs DC: जोस बटलर याची फटकेबाजी सुरुच, विराट कोहली याचा विक्रम मोडण्याच्या दिशेने वाटचाल, दिल्लीचे गोलंदाजही घायाळ
जोस बटलर (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) चा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) सोबत होत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या रॉयल्स संघासाठी पुन्हा एकदा जोस बटलर (Jos Buttler) याची जादू चालली. बटलरने केवळ 57 चेंडूंत आठ चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने शानदार शतक झळकावले. आयपीएल 2022 मधील बटलरचे हे तिसरे शतक आहे. बटलर अखेर 65 चेंडूत 116 धावा करून मुस्तफिजुर रहमानच्या गोलंदाजीवर बाद झाला. एकूणच, आयपीएलमध्ये बटलरने आता चार शतके केली आहेत. सध्याच्या आयपीएल (IPL) हंगामात बटलरने तीन सामन्यात शंभरी धावसंख्या ओलांडली तर गेल्या वर्षी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने पहिले शतक झळकावले होते. बटलरच्या या झंझावाती खेळीमुळे आता तो ‘रनमशीन’ विराट कोहलीच्या  (Virat Kohli) आतापर्यंत अबाधित राहिलेला रेकॉर्ड मोडण्याच्या जवळ पोहोचला आहे. (IPL 2022, DC vs RR Match 34: जोस बटलरचे झंझावाती शतक, पडिक्क्लच्या अर्धशतकी खेळीने राजस्थानचा 222 धावांचा डोंगर; दिल्लीच्या गोलंदाजांची दैना)

भारतीय दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आयपीएलच्या एकाच सत्रात सर्वाधिक 973 धावा चोपल्या होत्या. विराटने 2016 मध्ये आपल्या या विक्रमी खेळी चार शतके ठोकली होती. आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात इतकी शतकी खेळी करण्याचा रेकॉर्ड विराटच्या नावे आहे, ज्याला अजूनही कोणी टक्कर देऊ शकलेला नाही. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सचा स्टार सलामीवीर बटलरने आतापर्यंत 7 सामन्यात 3 शतके केली आहेत. अशाप्रकारे विराट कोहलीचा रेकॉर्ड आता धोक्यात सापडला आहे. बटलर एक सीजनमध्ये सर्वात जास्त शतके करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. बटलरच्या आधी ख्रिस गेल, हासिल आमला, शिखर धवन आणि शेन वॉटसन अशा धुरंधर फलंदाजांनी एका सत्रात दोन शतके झळकावली आहेत. तसेच बटलरने आयपीएल 2022 मध्ये तीन शतके झळकावली असून कोहली आता त्याच्या पुढे आहे. कोहलीने 2016 आयपीएलमध्ये 4 शतके झळकावली होती.

दुसरीकडे, यासोबतच बटलरने कोहलीचा आयपीएल इतिहासातील आणखी एक विक्रमही धोक्यात आणला आहे आणि तो म्हणजे एका मोसमातील सर्वाधिक धावा आहेत. कोहलीने 2016 मध्ये खेळल्या गेलेल्या 16 सामन्यांमध्ये 4 शतके आणि 7 अर्धशतकांच्या मदतीने 973 धावा केल्या होत्या. एका मोसमात एका फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. पण यावेळी बटलर ज्या पद्धतीने खेळतोय त्यावरून तो कोहलीचा हा विक्रम मोडीत काढेल असं चित्र सध्या दिसत आहे. बटलरने केवळ 7 सामन्यांमध्ये 491 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत बटलरकडे यावेळी कोहलीचा अबाधित रेकॉर्ड धुळीस मिळवण्याची संधी आहे.