IPL 2022, RR vs CSK: चेन्नईच्या पराभवामुळे राजस्थानला प्लेऑफचे तिकीट, गुणतक्त्यातही थेट दुसरा क्रमांक; 'यशस्वी' कामगिरीपुढे मोईनचा झंजावातही झाकोळला
यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन (Photo Credit: PTI)

IPL 2022, RR vs CSK Match 68: एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघावर 5 गडी राखून मात करत संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) प्लेऑफचे तिकीट कन्फर्म केले आहे. सीएसकेने (CSK) राजस्थानविरुद्ध 150 धावांपर्यंत मजल मारली, प्रत्युत्तरात संघाने अर्धा संघ गमावून 19.4 ओव्हरमध्ये लक्ष्य गाठले. अशाप्रकारे धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई संघाला शेवटच्या लीग सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच राजस्थान रॉयल्सने 2018 नंतर प्रथमच प्लेऑफ फेरीत एन्ट्री घेतली आहे. इतकंच नाही तर रॉयल्सने या विजयाच्या बळावर लखनऊ सुपर जायंट्सला जोरदार झटका देत गुणतक्त्यात दुसरे मानाचे स्थान मिळवले आहे. त्यामुळे आता 24 मे रोजी आयपीएलच्या पहिल्या प्लेऑफ सामन्यात राजस्थानचा सामना ‘टेबल टॉपर’ गुजरात टायटन्सशी होईल. (IPL 2022, RR vs CSK: सामन्याचा निकाल लागण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सला मिळाले प्ले ऑफचे तिकीट, आता दिल्ली आणि बेंगलोरमध्ये चुरस)

राजस्थानसाठी यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) सार्वधिक 59 धावा केल्या. तर आर अश्विनच्या झटपट फलंदाजीच्या बळावर संघाने विजयीरेष ओलांडली. अश्विन 40 धावा करून नाबाद परतला. 151 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल्सची सुरुवात खराब झाली. संघाचा स्टार सलामीवीर जोस बटलर अवघ्या दोन धावा करून बाद झाला. त्यानंतर जयस्वाल आणि सॅमसनच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी करून धावफलक हलता ठेवला. यानंतर चेन्नईने नियमित अंतराने चार विकेट घेत राजस्थानला बॅकफूटवर ढकलले. पण छोट्या धावसंख्येचा बचाव करताना अश्विन आणि रियान पराग यांनी चेन्नईच्या गोलंदाजांची दमछाक केली. प्रशांत सोलंकीने चेन्नईसाठी सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तसेच मोईन अली मिचेल सँटनर आणि सिमरजीत सिंह यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.

यापूर्वी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीचा टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय मोईन अली वगळता त्याचे अन्य फलंदाज योग्य सिद्ध करू शकले नाही. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्वेची सलामी जोडी स्वस्तात परतली. तर अंबाती रायुडू आणि एन जगदीसन देखील फारसे योगदान देण्यात अपयशी ठरले. मोईन अलीच्या 93 धावांच्या जोरावर राजस्थानने 150 धावसंख्या गाठली. मोईन अलीने तुफानी फलंदाजी करताना 19 चेंडूत अर्धशतक झळकावले, जे यावर्षीचे दुसरे वेगवान अर्धशतक आहे. मोईनशिवाय धोनीने 26 धावांची खेळी खेळली. राजस्थानकडून मॅकॉय आणि चहलने प्रत्येकी 2 बळी घेतले.