IPL 2022, PBKS vs LSG: रोमांचक सामन्यात लखनौचा 20 धावांनी ‘नवाबी’ विजय, 154 धावांचा बचाव करताना पंजाबच्या फलंदाजांची उडवली दाणादाण
लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, PBKS vs LSG: लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात आयपीएलचा (IPL) 42 वा सामना पुणेच्या MCA येथे नुकताच पार पडला. या रोमहर्षक सामन्यात लखनौच्या संघाने शानदार गोलंदाजीच्या बळावर पंजाबच्या फलंदाजांची दाणादाण उडवली आणि विजयाची नोंद केली. पंजाबसमोर विजयासाठी अवघे 154 धावांचे लक्ष्य होते, प्रत्युत्तरात पंजाब किंग्स निर्धारित 20 षटकांत 8 विकेट गमावून 133 धावाच करू शकले आणि त्यांना 20 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबसाठी जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक 32 धावा केल्या तर कर्णधार मयंक अग्रवालने 25 धावांची तांबडतोड खेळी खेळली. याशिवाय ऋषी धवन 21 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, लखनौच्या गोलंदाजांनी बॅटने निराशाजनक कामगिरीची भरपाई करून संघाच्या झोळीत विजय पाडला. या विजयसह लखनौने गुणतालिकेत 12 पॉईंटसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. तर पंजाबचे सातवे स्थान अबाधित आहे. (IPL 2022, PBKS vs LSG: खेळाडूवृत्तीचे अनोखं उदाहरण! अंपायरच्या निर्णयाची वाट न पाहता Quinton de Kock ने केले वॉकआउट Watch Video)

सामन्याबद्दल बोलायचे तर धावांचा पाठलाग करताना मयंक अग्रवाल आणि शिखर धवनच्या सलामी जोडीने संयमी सुरुवात केली. आक्रमक मयंकने सुरुवातीलाच आक्रमक पवित्रा घेतला तर धवन संथ खेळी करत राहिला. मयंक 35 धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर पंजाबने धवन आणि भानुका राजपक्षे यांच्या झटपट विकेट गमावल्या. धवन 5 तर राजपक्षे 9 धावाच करू शकले. लियाम लिविंगस्टोनही काही फटके खेळून तंबूत परतला. संघ अडचणीत असताना बेअरस्टोकडून मोठ्या खेळाची अपेक्षा होती, दुष्मंथा चमीराने त्याला झेलबाद करून लखनौला मोठा दिलासा मिळवून दिला. जितेश शर्मा आणि कगिसो रबाडा प्रत्येकी दोन, राहुल चाहरने 4 धावा केल्या. लखनौसाठी मोहसीन खानने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तसेच कृणाल पांड्या आणि दुष्मंथा चमीरा यांनी प्रत्येकी दोन व रवी बिष्णोईने एक गडी बाद केला.

यापूर्वी लखनौसाठी प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डी कॉकने 37 चेंडूत 46 आणि दीपक हुडाने 28 चेंडूत 34 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. दोंघांनी दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. तसेच पंजाबसाठी रबाडाने 38 धावांत चार बळी घेतले. लेगस्पिनर राहुल चहर 2आणि वेगवान गोलंदाज संदीप शर्माने एक विकेट घेऊन रबाडाला चांगली साथ दिली.