आयपीएल (IPL) अध्यक्ष ब्रिजेश पटेल (Brijesh Patel) यांनी 26 मार्चपासून भारतातील प्रतिष्ठित टी-20 ची सुरुवात होणार असल्याची पुष्टी केली आहे. तर 29 मे रोजी अंतिम सामना खेळला जाईल असेही म्हटले आहे. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मुंबई आणि पुणेच्या 4 ठिकाणी खेळली जाईल. 55 सामने मुंबईत तर 15 सामने पुण्यात होणार आहेत. पण पाचवेळचा चॅम्पियन संघ असलेल्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आयपीएल मुंबई येथे असूनही यावेळी घरच्या मैदानाचा फायदा मिळणार नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई (Mumbai) संघ त्यांचे ‘होम ग्राउंड’ वानखेडे स्टेडियमवर कोणताही सामना खेळणार नाही. मुंबईच्या तीन मैदानांवर 55 सामने होणार असून मुंबई संघाला ‘होम ग्राउंड’चा गैरफायदा मिळू नये म्हणून मुंबई इंडियन्सच्या मुंबईत खेळण्यावर काही फ्रँचायझींनी आक्षेप घेतल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचे सर्व सामना वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) ऐवजी दुसऱ्या ठिकाणी खेळले जातील. (IPL 2022: ‘हा अन्याय होईल...’! संघांना ‘या’ कारणामुळे होतोय मुंबई इंडियन्सचा त्रास, फ्रँचायझींनी BCCI कडे उठवला आवाज)
मुंबईतील सामने वानखेडे स्टेडियम, DY पाटील स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळले जातील तर एमसीए स्टेडियम पुण्यातील सामने आयोजित करेल. अशा परिस्थितीत आता मुंबई इंडियन्स संघाला विरोधी फ्रँचायझी संघाचा पाहुणचार करण्यासाठी ब्रेबॉर्न आणि पुण्यातील गहुंजे स्टेडियम असे दोन पर्याय उपलब्द आहे. आणि आयपीएलची सर्वात यशस्वी फ्रँचायझी, मुंबई, आपले घरचे सामने पुणे येथे खेळण्याची शक्यता असून बीसीसीआय येत्या काही दिवसात आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जारी करून यावर शिक्कामोर्तब करेल.
उल्लेखनीय म्हणजे, BCCI अधिकाऱ्यांनी आयपीएल 2022 भारतात आयोजित करण्याचा विश्वास दाखवला आहे. टी-20 लीगची 2020 आवृत्ती UAE मध्ये खेळली गेली होती. चेन्नई, मुंबई, अहमदाबाद आणि दिल्ली येथे सामने खेळले गेले परंतु फ्रँचायझींच्या बायो-बबलमध्ये कोविड-19 प्रकरणांमुळे हंगाम मधेच स्थगित करण्यात आला. त्यांनतर बीसीसीआयने दुसरा टप्पा यूएईमध्ये घेऊन हंगाम संपुष्टात आणला. एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने गेल्या वर्षी अंतिम सामन्यात इयन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्स संघावर मात करून तिसरे विजेतेपद पटकावले होते.