IPL 2022, MI vs KKR: मुंबई आणि कोलकाताचे ‘हे’ दोन धुरंधर आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा झाले ‘Golden Duck’ चे शिकार, आजच्या सामन्यात असेल सर्वांची नजर
रोहित शर्मा, ईशान किशन (Photo Credit: Twitter/mipaltan)

IPL 2022, MI vs KKR: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स  (Kolkata Knight Riders) आज पुणेच्या गहुंजे स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. मुंबईची कमान रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या हाती असेल, तर केकेआरची कमान श्रेयस अय्यरकडे असेल. याशिवाय चाहत्यांना आजच्या सामन्यात रोहित आणि कोलकाताचा सलामीवीर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्यात आंतरिक लढाई पाहायला मिळेल. उल्लेखनीय म्हणजे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि केकेआरचा (KKR) सलामीवीर अजिंक्य रहाणे या दोघांनीही या स्पर्धेत अगणित मॅच-विनिंग खेळी खेळल्या आहेत, एका बाबतीत दोघांमध्ये मोठी समानता आहे. शर्मा आणि रहाणे हे दोघेही आयपीएलच्या इतिहासात 13 ‘गोल्डन डक’वर (Most Ducks in IPL) बाद झाले आहेत. (IPL 2022, MI vs KKR Match 14: रोहित शर्मा याच्या नेतृत्वाची आज अग्निपरीक्षा; कोलकाताविरुद्ध दोन खेळाडूंना डच्चू, पराभवानंतर मुंबईच्या संघात होणार बदल)

त्यामुळे, इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणार विक्रमी 14 वा आकडा टाळण्यासाठी दोन्ही खेळाडू संघर्षपूर्ण खेळ करतील. रोहित शर्मा 215 आयपीएल सामन्यांमध्ये 13 वेळा खाते न उघडता बाद झाला आहे तर त्याचा टीम इंडिया सहकारी आणि केकेआर सलामीवीर अजिंक्य रहाणे 154 आयपीएल सामन्यात 13 ‘गोल्डन डक’चा बळी पडला आहे. दरम्यान आयपीएलच्या इतिहासातील या नकोशा यादीत अन्य धुरंधर खेळाडूंचाही समावेश आहे. दोन वेळा आयपीएल विजेता आणि कोलकाताचा माजी कर्णधार गौतम गंभीर 154 सामन्यात 12 वेळा भोपळाही फोडू शकलेला नाही. याशिवाय अनेक आयपीएल फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व केलेला दिनेश कार्तिक देखील समान परिस्थितीत असून तो देखील 12 वेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे. तसेच रहाणे आणि रोहितला वगळता या नकोशा विक्रमी यादीत पियुष चावला, हरभजन सिंह, मनदीप सिंह, पार्थिव पटेल, अंबाती रायुडू यांनी देखील 13 वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.

दुसरीकडे, आजच्या सामन्याबद्दल बोलायचे तर कोलकाता नाईट रायडर्स पंजाब किंग्जवर धमेदार विजय मिळवून आत्मविश्वासाने मुंबईविरुद्ध मैदानात उतरेल. श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात केकेआरने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत, तर मुंबई इंडियन्ससाठी परिस्थिती खूपच वाईट आहे, ज्यांनी त्यांचे पहिले दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे रोहितची पलटन आजच्या सामन्यात विजयी पताका फडकवण्याच्या उद्देशाने मैदानात पाऊल ठेवेल.