IPL Auction 2022: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मेगा लिलाव सुरू होण्यासाठी फक्त काही तास शिल्लक आहेत. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू (Bangalore) येथे होणाऱ्या लिलावात लीगमधील सर्व 10 संघात मोठ्या खेळाडूंना सामील करून घेण्यासाठी चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल. यासोबतच देश-विदेशातील खेळाडूंपैकी फ्रँचायझींच्या नजरा अष्टपैलू खेळाडूंवरही असेल. टी-20 क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंना खूप मागणी आहे. अष्टपैलू खेळाडू संघात फिनिशरची भूमिका बजावतात आणि आयपीएल (IPL) सारख्या स्पर्धात्मक लीगमध्ये गोलंदाजीसोबतच हे खेळाडू वेगवान धावा करण्यात माहीर असतात. यावेळी आयपीएल 2022 च्या लिलावात (IPL Auction) अनेक अष्टपैलू खेळाडूंना फ्रँचायझींनी रिटेन केले आहेत. तथापि, असे काही अष्टपैलू खेळाडू आहेत ज्यांच्यावर फ्रँचायझी मोठा सट्टा लावण्यापासून मागे हटणार नाही. (IPL Auction 2022: आयपीएल 15 होणार दमदार; 10 पैकी 7 संघांचे कर्णधारांच्या नावावर शिक्कामोर्तब, 3 फ्रँचायझी नवीन चेहऱ्यांच्या शोधात)
जेसन होल्डर (Jason Holder)
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर सध्या भारतात मर्यादित षटकांची मालिका खेळत आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध त्याने मायदेशात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 चेंडूत सलग 4 विकेट्स घेतल्या. होल्डर वेगवान गोलंदाजीसोबत मधल्या फळीमध्ये किंवा तळाशी वेगवान फलंदाजीने योगदान देऊ शकतो. त्याने आयपीएलच्या 26 सामन्यांमध्ये 22.46 च्या सरासरीने 35 विकेट्स घेतल्या आहेत आणि 121.15 च्या स्ट्राइक रेटने 189 धावा केल्या आहेत. होल्डर गेल्या मोसमात सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळला होता.
मिचेल मार्श (Mitchell Marsh)
ऑस्ट्रेलियन अष्टपैलूने गेल्या वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेत संघाच्या विजयी मोहिमेत निर्णायक भूमिका बजवावी होती. त्याने 77 धावांची नाबाद खेळी केली. तो आयपीएल 2020 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता, परंतु दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला होता. तसेच तो 2021 मध्ये खेळला नाही. मार्शने आयपीएलमधील 21 सामन्यांमध्ये 21 च्या सरासरीने 20 विकेट घेतल्या आहेत आणि 15 डावात 114.21 च्या स्ट्राइक रेटने 225 धावा केल्या आहेत. मार्शकडे बॅट तसेच चेंडूनेही योगदान देण्याची क्षमता आहे आणि त्यामुळेच त्याला लिलावात जास्त मागणी असू शकते.
शाहरुख खान (Shahrukh Khan)
तामिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. शाहरुख फिरकी गोलंदाजीने देखील योगदान देऊ शकतो. अलीकडेच त्याने अनेक दमदार खेळी खेळून देशांतर्गत स्पर्धांमध्ये फिनिशर म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. अशा स्थितीत मोठे षटकार मारण्यात माहीर असलेल्या शाहरुखसाठी अनेक फ्रँचायझींमध्ये चढाओढ होऊ शकते. शाहरुख मागील हंगामात पंजाब किंग्ज संघाचा भाग होता, मात्र लिलावपूर्वी फ्रँचायझीने त्याला कायम ठेवले नाही.