IPL 2022, LSG vs DC: दिल्ली कॅपिटल्सवर लखनौचे नवाब पडले भारी; KL Rahul, मोहसीन खान यांनी केली कमाल
लखनऊ सुपर जायंट्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, LSG vs DC Match 45: केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) आयपीएलच्या (IPL) 15 व्या हंगातील आपली जबरदस्त कामगिरी आणि दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 6 धावांनी विजय मिळवला. लखनौने दिल्लीसमोर विजयासाठी 196 धावांचे भव्य लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात खराब फलंदाजीने दिल्लीचा घात केला आणि संघ निर्धारित 20 षटकांत 7 विकेट गमावून 189 धावाच करू शकला. अशाप्रकारे लखनौने पॉईंट टेबलमध्ये जोरदार उडी घेत प्लेऑफच्या दिशेने आगेकूच सुरु ठेवली आहे. तर दिल्ली संघासमोर शर्यतीतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे. दिल्लीसाठी लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) सर्वाधिक 44 धावा केल्या. तर मिचेल मार्शने 37 आणि रोवमन पॉवेलने 35 धावांचे छोटेखानी योगदान दिले. तसेच अक्षर पटेल 42 धावा करून नाबाद राहिला. दुसरीकडे, लखनौच्या विजयात कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि वेगवान गोलंदाज मोहसीन खान (Mohsin Khan) यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. राहुलने सर्वाधिक 77 धावा केल्या, तर मोहसीनने चार विकेट घेऊन दिल्लीला अडचणीत पाडले. (IPL 2022, LSG vs DC: केएल राहुलचा मोठा पराक्रम, IPL मध्ये सलग पाच हंगामात असा कारनामा करणारा ठरला फक्त तिसरा भारतीय फलंदाज)

सामन्याबद्दल बोलायचे तर दिल्लीला नियमित विकेट्सचा जोरदार फटका बसला. पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर एकेरी धावसंख्येवर बाद झाले. यानंतर कर्णधार पंत आणि मार्श यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव स्थिरावला. लखनौच्या गोलंदाजांनी नियमित विकेट घेतल्याने दिल्लीचा संघ दडपणात आला. पंत आणि मार्शच्या जोडीला वगळता अन्य खेळाडू अडचणीच्या परिस्थितीत भागीदारी करण्यात अपयशी ठरले. मिचेल मार्श 37 धावा करून बाद झाला तर ललित यादवच्या रूपाने दिल्लीला चौथा धक्का बसला. ऋषभ पंतही संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला आणि 44 धावाच करू शकला. अशा परिस्थितीत ताबडतोड फलंदाजी करून खेळणाऱ्या रोवमन पॉवेलकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या, पण तो देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. याशिवाय लखनौचे सर्व तीन विकेट घेणारा शार्दुल ठाकूर अवघ्या एका धावेवर बाद झाला. अक्षरसह कुलदीप यादवही 16 धावा करून नाबाद राहिला.

यापूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार राहुल आणि दीपक हुडा यांनी सार्थक ठरवला. लखनौच्या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली होती. क्विंटन डी कॉक 13 चेंडूत 23 धावा काढून बाद झाला. तसेच हुडाने 34 चेंडूत 52 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली आणि राहुल 51 चेंडूत 77 धावा करून बाद झाला. दिल्ली कॅपिटल्सकडून शार्दुल ठाकूरने तीन बळी घेतले.