IPL 2022, LSG vs DC: केएल राहुलचा मोठा पराक्रम, IPL मध्ये सलग पाच हंगामात असा कारनामा करणारा ठरला फक्त तिसरा भारतीय फलंदाज
केएल राहुल (Photo Credit: PTI)

IPL 2022, LSG vs DC: लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) स्टार कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आयपीएलच्या (IPL0 15 व्या पर्वात जबरदस्त फलंदाजी करत आहे. राहुलने दिल्ली कॅपिटल्स (Delhi Cappitals) विरुद्धच्या सामन्यात कॅप्टन्सी खेळी खेळली आणि 77 धावा चोपल्या. या सामन्यात केएल राहुलला दीपक हुडाची चांगली साथ मिळाली आणि त्याने संघासाठी 52 धावांची खेळी केली. या दोन फलंदाजांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारीही झाली आणि याच जोरावर लखनौने 20 षटकात 3 गडी गमावून 195 धावा केल्या. ऑरेंज कॅपच्या दावेदारांपैकी एक राहुलने सलग पाचव्या हंगामात 400 धावांचा टप्पा ओलांडला आणि सुरेश रैना, शिखर धवन व डेविड वॉर्नर यांच्यासमवेत एलिट यादीत नाव नोंदवले. सामन्याबद्दल बोलायचे तर प्रथम फलंदाजी करताना राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स संघाने 20 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 195 धावा केल्या. (IPL 2022, DC vs LSG Match 45: आयपीएलमध्ये KL Rahul चे वादळ कायम, लखनौने दिल्लीसमोर ठेवले 196 धावांचे आव्हान; शार्दूल ठाकूरच्या खिशात 3 विकेट्स)

केएल राहुलने आयपीएल 2022 मध्ये आपला शानदार फॉर्म सुरू ठेवला आणि रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आणखी एक अर्धशतक झळकावले. लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधाराने देखील हंगामात 400 धावा पार केल्या, भारतीय सलामीवीराने सलग पाचव्या वर्षी आयपीएलमध्ये अशी कामगिरी केली आहे. पंजाबमधील त्याच्या गेल्या चार हंगामात राहुल प्रत्येक वर्षात स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी होता. दरम्यान आपल्या या खेळीत राहुलने अनेक विक्रमांना गवसणी घातली.

या सामन्यात केएल राहुलने आपल्या डावात 5 षटकार ठोकले आणि आयपीएलमध्ये सर्वात जलद 150 षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला. राहुलने आपल्या 95 आयपीएल डावात 150 षटकारांचा पल्ला गाठला आणि 125 डावात ही अप्रतिम कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनला पिछाडीवर टाकले. त्याचबरोबर सुरेश रैना या प्रकरणात तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 128 डावात विशेष कामगिरी पूर्ण केली. दिल्लीविरुद्धच्या या सामन्यात राहुलने 5 षटकार आणि 4 चौकारांसह 77 धावांची खेळी केली आणि यादरम्यान त्याने 51 चेंडूंचा सामना केला. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 150.98 होता. या पाच षटकारांच्या मदतीने राहुलने आयपीएलमध्ये 150 षटकार पूर्ण केले आणि लीगमध्ये सर्वात जलद 150 षटकार मारणारा फलंदाज बनला.