CSK च्या सिक्सर किंगने IPL 2008 मध्ये ठोकलेला षटकार आजही अबाधीत, 14 वर्षांनंतरी विक्रम मोडण्याची प्रतिक्षा कायम
अल्बी मॉर्केल, चेन्नई सुपर किंग्ज (Photo Credit: Instagram)

IPL Longest Six: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या आवृत्तीत इंग्लंडचा आतिशी अष्टपैलू लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) गोलंदाजांविरुद्ध कहर करत आहे. पंजाब किंग्जसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या लिविंगस्टोनने मोसमातील सर्वात लांब षटकार ठोकला आहे. मंगळवार, 3 मे रोजी लिविंगस्टोनने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीच्या चेंडूवर 117 उंच मीटर षटकार मारला गेल्या 14 हंगामापासून अबाधित असलेल्या आयपीएल विक्रमाच्या जवळ पोहचू शकला नाही. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) दरवर्षी डझनभर खेळाडू 100 मीटरपेक्षा लांब षटकार मारताना आपण पाहतो, परंतु 2008 मध्ये सर्वाधिक लांब षटकार मारण्याचा विक्रम या लीगमध्ये आजतागायत कायम आहे. आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या माजी अष्टपैलू अल्बी मॉर्केलच्या (Albie Morkel) नावावर आहे, ज्याने चेन्नई सुपर किंग्जसाठी 125 मीटर षटकार ठोकला होता. आयपीएल (IPL) इतिहासातील हा सर्वात लांब षटकार आहे. (IPL 2022: ‘या’ भारतीय सुपरस्टार्सचा आयपीएलच्या सुरुवातीलाच संघर्ष, फ्रँचायझीच नव्हे तर चाहत्यांचाही होतोय अपेक्षा भंग)

आज आपण आयपीएलमधील सर्वात लांब षटकारांबद्दल बोलत आहोत कारण या लीगमधील टॉप 10 सर्वात लांब षटकारांच्या यादीत लियाम लिविंगस्टोनचे नाव सामील झाले आहे. इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूने पंजाब किंग्जसाठी 117 मीटर षटकार मारला, जो आयपीएल 2022 मधील आतापर्यंतचा सर्वात लांब षटकार आहे. यासह, तो आयपीएलमध्ये सर्वात लांब हिट्स मारण्याच्या बाबतीत पहिल्या 10 मध्ये आला आहे. आयपीएलमधील सर्वात लांब षटकारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर 124 मीटर लांब षटकार मारणाऱ्या प्रवीण कुमारचे नाव आहे. त्याचवेळी अ‍ॅडम गिलख्रिस्ट 122 मीटर लांब मारला होता. तसेच रॉबिन उथप्पाने 120 मीटरचा तर ख्रिस गेलनेही 119 मीटरचा षटकार मारला आहे. याशिवाय सहाव्या क्रमांकावर सिक्सर किंग युवराज सिंहचे नाव देखील आहे, ज्याने 119 मीटर लांब षटकार ठोकला. न्यूझीलंडचा निवृत्त दिग्गज रॉस टेलरनेही आयपीएलमध्ये एवढा लांबलचक षटकार ठोकला आहे. अखेरीस गौतम गंभीर, बेन कटिंग आणि आता लियाम लिविंगस्टोनने 117-117 मीटर लांबीचा षटकार ठोकले आहेत.

दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगच्या 2022 हंगामात लिविंगस्टोननंतर मुंबई इंडियन्सचा स्टार डेवाल्ड ब्रेविसचे नाव येते. ब्रेविसने 112 लांबीचा षटकार मारला आहे. यानंतर लिविंगस्टोन (108), जोस बटलर (107) आणि पुन्हा लिविंगस्टोन (106) लांबीचे सिक्स मारले आहेत. अशा परिस्थतीत या वर्षी स्पर्धेत सर्वात मोठा षटकार मारण्यासाठी फलंदाजांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे.