Andre Russell Scripts History: आंद्रे रसेलची कमाल कामगिरी, एकाच षटकात 4 विकेट घेत IPL इतिहासाला दिली कलाटणी
आंद्रे रसेल (Photo Credit: PTI)

IPL 2022, KKR vs GT: कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) गोलंदाज आंद्रे रसेलने (Andre Russell)गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध एकमेव षटक टाकले आणि या षटकात त्याने आयपीएलच्या (IPL) 14 वर्षांच्या इतिहासाला बदलून टाकला. कोलकातासाठी रसेल 20 व्या षटकात गोलंदाजीला आला आणि त्याने केकेआरसाठी (KKR) एक-दोन नाही तर चार विकेट घेतल्या. आयपीएलच्या इतिहासात 20 व्या षटकात एकाही गोलंदाजाला यापूर्वी चार विकेट मिळालेल्या नाहीत. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, पण संघ 156 धावाच करू शकला. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने 19 व्या षटकापर्यंत 5 गोलंदाज वापरले पण शेवटच्या षटकासाठी आंद्रे रसेलकडे चेंडू सोपवला, ज्याने संपूर्ण सामना फिरवून इतिहास रचला. (IPL 2022, KKR vs GT Match 35: हार्दिक पांड्याचे दमदार अर्धशतक; कोलकाता गोलंदाजांनी धावगतीला घातली लगाम, गुजरात टायटन्सच्या 156/9 धावा)

20व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रसेलने अभिनव मनोहरला (2 धावा) रिंकू सिंहच्या हाती झेलबाद केले, तर पुढच्या चेंडूवर लॉकी फर्ग्युसनल खाते न उघडता झेलबाद केले. तिसर्‍या चेंडूवर रसेलने धाव दिली आणि चौथ्या चेंडूवर चौकार दिला, मात्र पाचव्या चेंडूवर राहुल तेवतिया (17 धावा) रिंकू सिंहकडे झेलबाद झाला. आणि शेवटच्या चेंडूवर रसेलने यश दयालला पायचीत पकडले. अशाप्रकारे आंद्रे रसेलने एका षटकात 5 धावा देऊन 4 बळी घेतले. याआधी आयपीएलच्या इतिहासात उमरान मलिकने 20व्या षटकात तीन विकेट घेतल्या होत्या, मात्र रसेलने 4 विकेट घेत त्याला मागे टाकत या लीगमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तसेच गुजरात विरुद्ध अमित मिश्रा (वि. पुणे वॉरियर्स इंडिया 2013) आणि युजवेंद्र चहल (2022 मध्ये केकेआर) यांनी एका षटकात 3 विकेट घेतल्या, तर उमेश यादव आणि शिवम मावी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

तसेच रसेलला काही विक्रम करण्यासाठी एक ओव्हर पुरेशी होती. KKR अष्टपैलू आता टी-20 क्रिकेटमध्ये एका षटकात 4 बळी घेणारा एकमेव गोलंदाज आहे. तर आयपीएलमध्ये एका षटकात 4 फलंदाजांना बाद करणारा तो आता पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावापूर्वी KKR ने राखून ठेवलेल्या खेळाडूंपैकी एक, रसेलकडून आता बॅटसह महत्त्वपूर्ण खेळी अपेक्षित असेल. दुसरीकडे, या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल 2022 मध्ये प्रथमच एका कर्णधाराने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून, गुजरातने 20 षटकात 9 विकेट गमावून 156 धावा केल्या आणि कोलकाताला विजयासाठी 157 धावांचे लक्ष्य दिले.