IPL 2022, KKR vs DC: रंगतदार सामन्यात दिल्लीचा दमदार विजय; कोलकाताला पराभवाची चव चाखवली, Kuldeep Yadav याच्या विकेट्सचा ‘चौकार’
कुलदीप यादव (Photo Credit: PTI)

IPL 2022, KKR vs DC: आयपीएल (IPL) 2022 चा 19 वा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळला गेला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात दिल्लीने 44 धावांनी दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 5 बाद 215 धावा केल्या, जे या मोसमातील पहिल्या डावातील सर्वोच्च धावसंख्या आहेत. प्रत्युत्तरात केकेआर (KKR) संघाला आव्हान पेलले नाही आणि 19.4 षटकांत संघ 171 धावाच करू शकला. कोलकाता कर्णधार श्रेयसने 54 धावांची खेळी केली. तर नितीश राणाने 30 आणि रसेलने 24 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, दिल्लीसाठी फलंदाजांनंतर गोलंदाजांच्या दमदार खेळीने प्रभावित केले. दिल्लीकडून कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर खालील अहमद तीन, शार्दूल ठाकूर दोन आणि ललित यादवने 1 गडी बाद केला. (IPL 2022, KKR vs DC: दिल्लीच्या धुरंधर फलंदाजांनी कोलकाताच्या दोन मॅच-विनर खेळाडूंना फोडला घाम, 8 षटकांत लुटल्या 99 धावा)

दिल्लीकडून डेविड वॉर्नरने 61 आणि पृथ्वी शॉ याने 51 धावा केल्या. तर अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांनी सहाव्या विकेटसाठी 20 चेंडूत 49 धावांची भागीदारी करून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. शार्दुल 11 चेंडूत 29 तर अक्षर 14 चेंडूत 22 धावा करून नाबाद परतले. दुसरीकडे, केकेआरकडून सुनील नारायण 21 धावा देऊन दोन विकेट घेतल्या.याशिवाय त्यांचे स्टार गोलंदाज, उमेश यादव आणि पॅट कमिन्स सर्वात महागडे ठरले. दिल्लीकडून मिळालेल्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार श्रेयस अय्यरने एकाकी झुंज दिली. केकेआरचा कर्णधार श्रेयसला वगळता दिल्लीच्या भेदक गोलंदाजीपुढे संघाचे अन्य धुरंधर खेळाडू आव्हान देण्यात अपयशी ठरले. दिल्लीसाठी स्टार फिरकीपटू कुलदीप यादव याची एक ओव्हर सामन्याचा टर्निंग पॉईंट बनली. कुलदीपने पॅट कमिन्स आणि सुनील नारायण यांना एकाच षटकात बाद करून दिल्लीला विजयाच्या जवळ नेले.

अशाप्रकारे कोलकाता संघाने आता पाचपैकी दुसऱ्या सामन्यात पराभवाची चव चाखली असून गुणतालिकेत प्रभावी रनरेटच्या जोरावर पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. तर दिल्लीचा चार सामन्यातील हा दुसरा विजय ठरला, पण पॉईंट टेबलमध्ये संघाचे सातवे स्थान अबाधित राहिले आहे.