गुजरात टायटन्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, GT vs DC Match 10: हार्दिक पांड्या याच्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने ऋषभ पंत याच्या दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 14 धावांनी दणदणीत विजय मिळवून आयपीएल (IPL) 15 मध्ये आयपीएल विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. यावर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या गुजरातने लॉकी फर्ग्युसन  (Lockie Ferguson) याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीला पराभवाची धूळ चारली. शुभमन गिल याच्या दमदार खेळीच्या जोरावर गुजरातने 171 धावा करून दिल्लीसमोर विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य दिले होते, पण खराब फलंदाजीचा फटका पंतच्या दिल्लीला बसला आणि हंगामात पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्लीसाठी कर्णधार पंत याने सर्वाधिक 43 धावांचा डाव खेळला. तर ललित यादवने 25 आणि रोवमन पॉवेल 20 रन्सचे छोटेखानी योगदान दिले. दुसरीकडे, गुजरात टायटन्सच्या विजयात बॉलने फर्ग्युसनने महत्वाची भूमिका बजावली. त्याने आपल्या चार षटकांत 28 धावा खर्च करून चार विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमीने तीन, हार्दिक पांड्या आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. (IPL 2022, GT vs DC Match 10: रनआऊटमुळे तुटली ऋषभ पंत - ललित यादव यांची जोडी, दिल्ली कर्णधाराने ‘या’ कारणामुळे पंचांकडे व्यक्त केली नाराजी)

गुजरातने दिलेल्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात हवी तशी झाली नाही. दिल्लीने आपल्या पहिल्या तीन विकेट झटपट गमावल्या. टिम सेफर्ट, पृथ्वी शॉ आणि मनदीप सिंह यांनी स्वस्तात पॅव्हिलियनची वाट धरली. मात्र यानंतर कर्णधार पंतने संयमी फलंदाजी करून ललीत यादवसोबत संघाचा डाव स्थिरावला. ललितने आऊट होण्यापूर्वी पंतसोबत 61 धावांची भागीदारीने संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या. यानंतर फर्ग्युसनची आक्रमक गोलंदाजी सुरूच राहिली. त्याने आपल्या षटकांत दिल्लीची मोठी विकेट घेतली आणि पंतला माघारी धाडलं. पंत बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलने सलग दोन चौकार खेचले पण षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने फर्ग्युसनला आपली विकेट दिली. यानंतर अष्टपैलू शार्दूल ठाकूर देखील दोन धावा करून आल्या पावली परतला. पॉवेल देखील फारसा प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला.

यापूर्वी प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिलच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर शुबमन गिलने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 171 धावा केल्या. गुजरातकडून गिलने सर्वाधिक 84 धावा ठोकल्या. गिलने आपल्या खेळीत 46 चेंडूंचा सामना करून 6 चौकार आणि 4 षटकार ठोकले. तसेच कर्णधार हार्दिक पांड्याने 27 चेंडूत 31 धावा केल्या. तर दिल्ली कॅपिटल्सकडून मुस्तफिजुर रहमानने तीन बळी घेतले. आणि खलील अहमदने दोन गडी बाद केले.