IPL 2022, DC vs RR: राजस्थानचा ‘रॉयल’ विजय, नाट्यमय सामन्यात दिल्लीचा 15 धावांनी धुव्वा उडवला; Buttler चे शतक ठरले सरस!
राजस्थान रॉयल्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs RR: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात आयपीएलचा (IPL) 34 वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. राजस्थानने आपल्या विजयाची गाडी पुन्हा रुळावर आणली दिल्लीचा 15 धावांनी धुव्वा उडवला. राजस्थानने जोस बटलरच्या (Jos Buttler) वादळी शतकाच्या बळावर 222 धावा ठोकल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्ली निर्धारित षटकांत 8 विकेट्स गमावून 207 रन्सच करू शकली. दिल्लीकडून कर्णधार ऋषभ पंतने 44 धावा आणि सलामीवीर पृथ्वी शॉ ने 34 धावा केल्या. तसेच ललित यादव 37 धावांचे योगदान देऊन परतला. दुसरीकडे, रॉयल्सच्या गोलंदाजांनी आपली आक्रमक शैली कायम ठेवली आणि दिल्लीच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. राजस्थानसाठी प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर आर अश्विनला दोन आणि युजवेंद्र चहलला एक यश मिळाले. या विजयासह राजस्थान आता गुणतालिकेत नवीन ‘टेबल टॉपर्स’ बनले आहेत. (IPL 2022, RR vs DC: जोस बटलर याची फटकेबाजी सुरुच, विराट कोहली याचा विक्रम मोडण्याच्या दिशेने वाटचाल, दिल्लीचे गोलंदाजही घायाळ)

सामन्याबद्दल बोलायचे तर राजस्थानने दिलेल्या भव्य लक्ष्याचा पाठलाग करताना डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ या सलामी जोडीने आश्वासक सुरुवात करून दिली. पृथ्वी संयमाने फलंदाजी करताना दिसला तर वॉर्नरने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला. वॉर्नर 14 चेंडूत 28 धावा करून कृष्णाच्या चेंडूवर सॅमसनकरवी झेलबाद झाला. यानंतर दिल्लीने सरफराज खानची दुसरी विकेट झटपट गमावली. तर पृथ्वी 27 चेंडूत 37 धावा करून आर अश्विनचा बळी ठरला. विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना कर्णधार पंतने ललितसोबत डाव हाताळला आणि संघाला शंभरी धावसंख्या पार करून दिली. पण 124 धावसंख्येवर देवदत्त पडिक्क्लने अप्रतिम कॅच घेऊन दिल्लीचा कर्णधार पंत 24 चेंडूत 44 धावांच्या खेळीवर ब्रेक लावला. पंतनांतर आलेल्या अक्षर पटेलचा त्रिफळा उडवून चहलने राजस्थानला विजयाच्या आणखी जवळ नेले. शार्दुल ठाकूर 7 चेंडूत 10 धावांत बाद झाला. अंतिम षटकांत 36 धावांची गरज असताना पॉवेलने सलग तीन षटकारांची ठोकले. पण मॅकॉयच्या शेवटच्या चेंडूवर पॉवेल बाद झाला आणि राजस्थानने हा सामना खिशात घातला.

तत्पूर्वी नाणेफेक गमावून फलंदाजीला उतरलेल्या राजस्थान रॉयल्ससाठी बटलरने 65 चेंडूत 9 चौकार आणि तितक्याच षटकारांसह 116 धावांची धडाकेबाज खेळी केली. या मोसमातील हे बटलरचे तिसरे ठरले. बटलरऐवजी देवदत्त पडिक्कलने 35 चेंडूत 54 धावा केल्या. बटलर आणि पडिक्कल यांनी पहिल्या विकेटसाठी 155 धावांची मोठी भागीदारी करून संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. तसेच कर्णधार संजू सॅमसनने 19 चेंडूत 46 धावांची नाबाद खेळी खेळत संघाची धावसंख्या 222 पर्यंत नेली. दिल्लीकडून खलील अहमद आणि मुस्तफिजुर रहमान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.