IPL 2022, CSK vs DC: मोईन अलीच्या फिरकीसमोर दिल्लीची दाणादाण; चेन्नई सुपर किंग्सचा 91 धावांनी मोठा विजय, ‘शिष्य’ पंतवर ‘गुरु’ Dhoni वरचढ
चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs DC: मोईन अलीची (Moeen Ali) फिरकी आणि डेव्हॉन कॉन्वेच्या (Devon Conway) वादळी अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) आयपीएलच्या 15 व्या हंगातील चौथा सामना खिशात घातला आणि दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) 91 धावांनी धूळ चारली. सीएसकेने दिल्लीसमोर 209 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वातील DC संघ 17.4 षटकांत 10 विकेट गमावून 117 धावांच करू शकला आणि चेन्नईने मोठा विजय नोंदवला. यासह एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात यंदाचा दुसरा सामना जिकून चेन्नईने प्लेऑफच्या आपल्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. सीएसके संघाने 11 पैकी चार सामने जिंकून महत्वपूर्ण दोन गुण घेत 8 पॉईंटसह गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर झेप घेतली. तर 6 वा पराभव पत्करलेल्या दिल्लीचे पाचवे स्थान कायम आहे. (IPL 2022, CSK vs DC: MS Dhoni ने केला नवा पराक्रम, आतापर्यंत फक्त कर्णधार कोहलीने चाखली होती ‘विराट’ विक्रमाची चव, जाणून घ्या)

चेन्नईने दिलेल्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि नियमित अंतराने विकेट्स गमावण्याचा त्यांना जबर फटका बसला. केएस भरत आणि डेविड वॉर्नरची नवी सलामी जोडी पॉवरप्ले मधेच गारद झाली. वॉर्नरने 19 तर भरत 8 धावाच करू शकला. त्यानंतर पंत आणि मिचेल मार्शच्या जोडीने काही मोठे फटके खेळून धावफलक हलता ठेवला. मार्शने दिल्लीकडून सर्वाधिक 25 धावांची खेळी केली. तर्ष पंतने 21 धावा केल्या. पंत आणि रिपल पटेलला मोईन अलीने आपल्या एकाच ओव्हरमध्ये बाद करून दिल्लीला बॅकफूटवर ढकलले. अक्षर पटेल, रोवमन पॉवेल आणि कुलदीप यादव देखील झटपट माघारी परतले. अखेरीस शार्दूल ठाकूर 24 धावांची छोटी खेळी केली. चेन्नईकडून मोईन अलीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तसेच सिमरजीत सिंह, ड्वेन ब्रावो आणि मुकेश चौधरीने प्रत्येकी 2-2 तर, महेश तीक्षणाला 1 यश मिळाले.

यापूर्वी पहिले फलंदाजीला येत ऋतुराज गायकवाड (41) आणि डेव्हॉन कॉन्वे (87) यांनी पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी करून चेन्नईला झंझावाती सुरुवात करून दिली. यानंतर दुबेने 32 धावांची शानदार खेळी खेळली. शेवटी, CSK ची फलंदाजी गडगडली, ज्यामुळे संघ केवळ 208 धावांपर्यंत पोहोचू शकला. धोनीने 8 चेंडूत 21 धावांची नाबाद खेळी खेळली. दुसरीकडे, दिल्लीकडून एनरिच नॉर्टजेने तीन तर खलील अहमदने दोन गडी बाद केले. लक्षणीय आहे की चेन्नईने या मोसमात चौथ्यांदा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे.