IPL 2022: कमेंटरी रूममधून धवल कुलकर्णीची मुंबई इंडियन्स ताफ्यात होणार होमकमिंग? सलग 6 सामने हरल्यानंतर रोहित शर्माला झाली आठवण
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: PTI)

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 15 मध्ये मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. यामुळे संघाचे चाहते खूप निराश झाले आहेत. संघाची गोलंदाजी खूपच कमकुवत दिसत आहे, त्यामुळे संघ समोरच्या संघावर दबाव आणण्यात अपयशी ठरली आहे. अशा परिस्थितीत आता मुंबई इंडियन्सच्या कॅम्पसमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई आता अनुभवी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni) याचा मुंबईच्या ताफ्यात समावेश करू शकते. आयपीएल (IPL) लिलावादरम्यान कुलकर्णीला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. त्यानंतर तो स्टार स्पोर्ट्स हिंदी कॉमेंट्री टीमचा एक भाग बनला. अशा परिस्थितीत तो आता पुन्हा एकदा मैदानात एन्ट्री मारण्याच्या तयारीत आहे. (IPL 2022, MI vs CSK: 15व्या पर्वात मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर उनाडकटने गोलंदाजांना केले खास आवाहन, सांगितला विजयाचा गेम प्लॅन)

या मोसमात मुंबई इंडियन्सला 6 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. ज्यानंतर मुंबई इंडियन्स जवळपास प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. बुमराह वगळता एकाही गोलंदाजाने विशेष प्रभावित करता आलेले नाही. “MI चा कर्णधार रोहित शर्मा त्यांच्या वेगवान आक्रमणाला बळ देण्यासाठी कुलकर्णीला सामील करण्यास उत्सुक होता. मुंबईचा असल्याने, आयपीएल-15 होत असलेल्या मुंबई आणि पुण्यात गोलंदाजी कशी करायची याची त्याला माहिती आहे. जसप्रीत बुमराह वगळता, सर्व MI वेगवान गोलंदाजांनी या मोसमात वाईटरित्या संघर्ष केला आहे आणि हे एक मोठे कारण आहे ज्यामुळे संघाला पहिल्या सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला व कोणत्याही आयपीएल आवृत्तीत त्याची सर्वात वाईट सुरुवात सहन करावी लागली,” एका सूत्राने टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यातून उद्धृत केले.

धवल कुलकर्णीच्या आयपीएलमध्ये अनुभवाबद्दल बोलायचे तर तो आयपीएलमध्ये मुंबई, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात लायन्सकडून खेळला आहे. यादरम्यान त्याने 92 आयपीएल सामन्यात 86 विकेट घेतल्या आहेत. कुलकर्णीला 2020 मध्ये मुंबईने 75 लाखांना विकत घेतले होते, त्यानंतर 2021 मध्येही तो संघाचा भाग होता. पण 2022 च्या लिलावात त्याला मुंबईने रिलीज केल्यावर कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. दरम्यान, कुलकर्णीच्या पुनरागमनामुळे मुंबईची गोलंदाजी अधिक भक्कम होईल कारण त्याला मुंबई आणि पुण्यात खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. तो देशांतर्गत क्रिकेटही खेळतो. अशा परिस्थितीत त्याच्या संघात सामील होण्याचा मुंबईला भरपूर मोठा फायदा होईल.