IPL 2021: आरसीबीला पहिले जेतेपद मिळवण्याची सुवर्णसंधी, ‘हे’ खेळाडू बनू शकतात मॅच विनर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premire League) 2021 चा दुसरा टप्पा यूएई (UAE) येथे 19 सप्टेंबर पासून होणार असून संघांनी दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू केली आहे. विराट कोहलीच्या  (Virat Kohli) नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघातील बरेच खेळाडूही संयुक्त अरब अमिराती येथे देखल झाले असून ते कंबर कसून सरावाला लागले आहेत. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी संघात अनेक मोठे बदल केले आहेत. आरसीबी (RCB) अद्याप एकही आयपीएल विजेतेपद न जिंकणाऱ्या काही मोजक्या संघांपैकी आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील संघाने आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यात चमकदार कामगिरी केली आणि यदां ते जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणतील अशी चाहत्यांना अशा आहे. आरसीबीने तीन वेळा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला पण त्यांना प्रत्येक वेळी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र यंदा चित्र बदलते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल आणि यामध्ये काही खेळाडू मॅच विनर ठरू शकतात. (IPL 2021: युएईमध्ये KKR विरुद्ध पहिल्या सामन्यात वेगळ्या रंगात दिसणार विराट कोहलीची RCB ब्रिगेड)

मोहम्मद सिराज (Mohammad Siraj)

टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या उत्तम लयीत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर सिराजची कारकीर्द पूर्णपणे बदलली. सिराजचा इकॉनॉमी रेट 2020 च्या आयपीएलमध्ये 8.68 होता, तर आयपीएल 2021 च्या पहिल्या सात सामन्यांमध्ये ती 7.34 होती. याशिवाय इंग्लंडविरुद्ध घरेलू मालिकेत सिराजने चमकदार कामगिरी केली आणि आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातही त्याने आरसीबीसाठी चांगली गोलंदाजी केली. अशास्थितीत दुसऱ्या टप्प्यात सिराज खेळ महत्वपूर्ण ठरू शकतो.

वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga)

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी आरसीबीने हसरंगाचा संघात समावेश केला आहे. यूएईच्या खेळपट्टीवर हसरंगा एक धोकादायक गोलंदाज म्हणून सिद्ध होऊ शकतो. हसरंगाने आपल्या फिरकीने जगभरातील फलंदाजांना अडचणीत आणले आहे.

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)

आरसीबीमध्ये आल्यानंतर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मॅक्सवेलने चांगली कामगिरी केली आहे आणि तो आरसीबीच्या मॅच-विनर्सपैकी एक बनला आहे. आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यात मॅक्सवेलने 7 सामन्यांत 223 धावा केल्या आणि आरसीबीच्या प्रभावी खेळीत बॅटने मोठे योगदान दिले. त्यामुळे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातही आरसीबीला मॅक्सवेलकडून बॅटने तशाच खेळीची गरज असेल.

आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा सुरू होण्यासाठी फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. हंगामातील उर्वरित 31 सामने 27 दिवसांदरम्यान दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे खेळले जातील. तसेच फायनल सामना 15 ऑक्टोबर रोजी दुबईत खेळला जाईल. आयपीएलच्या गुणतालिकेत 7 विजयांनंतर आरसीबी तिसऱ्या स्थानावर आहे आणि प्ले-ऑफ गाठण्यापासून फक्त काही पाऊल दूर आहे.