IPL 2021, SRH vs CSK: धोनी ‘ब्रिगेड’ला प्लेऑफ प्रवेशचा पहिला मान, चेन्नईकडून हैदराबाद 6 विकेटने चितपट; सनरायझर्सचा यंदाचा खेळ खल्लास
एमएस धोनी (Photo Credit: PTI)

IPL 2021, SRH vs CSK: शारजाह येथे झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 44 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) गुणतालिकेत तळाशी बसलेल्या सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) चितपट करून यंदाच्या प्लेऑफ (IPL Playoffs) फेरीत प्रवेश करण्याचा पहिला मान मिळवला आहे. हैदराबादने पहिले फलंदाजी करून दिलेल्या 135 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात चेन्नई सुपर 19.4 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून दणदणीत विजय मिळवला. एमएस धोनीने (MS Dhoni) उत्तुंग षटकार लगावून स्टाईलमध्ये संघाचा विजय निश्चित केला. चेन्नईच्या विजयात रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), फाफ डु प्लेसिस आणि ड्वेन ब्रावो यांनी महत्वाची भूमिका बजावली. रुतुराजने 44 आणि डु प्लेसिस 41 धावा केल्या. दुसरीकडे, ब्रावोने गोलंदाजीने सनरायझर्स फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. ब्रावोने संघासाठी सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, हैदराबादसाठी जेसन होल्डरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर राशिद खानने 1 गडी बाद केला.

हैदराबादच्या 135 धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी चेन्नईची सलामी जोडी डु प्लेसिस आणि गायकवाड मैदानात उतरले. रिद्धिमान साहाला वगळता SRH च्या एकाही खेळाडूला खास कामगिरी करता न आल्याने हैदराबाद संघ केवळ 134 धावांपर्यंत मजल मारु शकला. परिणामी चेन्नईने सहज विजय मिळवला. चेन्नईच्या सलामीवीरांनी तुफान सुरुवात करून संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. दोघे सलामीवीर चेन्नईला एकहाती विजय मिळवून देतील असे दिसत असताना होल्डरच्या गोलंदाजीवर गायकवाडचं अर्धशतक थोडक्यात हुकलं  आणि केन विल्यम्सनकडे तो झेलबाद झाला. गायकवाडने 38 चेंडू खेळत एकूण 45 धावा चोपले. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि दोन षटकार खेचले. यानंतर निर्णायक क्षणी राशिद खानच्या फिरकीत अडकून मोईन अली माघारी परतला. मोईनने एकूण 17 धावा केल्या. त्यानंतर अखेरच्या क्षणी होल्डरने रैना आणि डु प्लेसिसला बाद करून संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या. पण अंबाती रायुडूने होल्डरच्या या प्रयत्नानंतर पाणी फेरले आणि धोनीच्या साथीने संघाला विजयीरेष ओलांडून दिली.

दुसरीकडे, चेन्नई विरोधात सनरायझर्सच्या या परभवासह यंदाच्या आयपीएलमधील SRH चे आव्हान संपुष्टात आले आहे. हैदराबादचा 11 सामन्यातील हा नववा पराभव आहे. त्यामुळे केन विल्यम्सनचा हा संघ एकूण चार पॉईंटसह तळाशी बसला आहे.